Pune PMPML | सत्ताधारी भाजपने लाखो प्रवाशांना सोडले वाऱ्यावर | पीएमपीएमएल अधिकारी बदलाचा खेळ कोणासाठी? | माजी आमदार मोहन जोशी यांचा सवाल
Pune News – (The Karbhari News Service) – गेल्या ७ वर्षात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) चे ८ अध्यक्ष बदलून व्यवस्थेचा खेळ खंडोबा केला. हा सगळा खेळ सत्ताधारी भाजप कोणासाठी खेळत आहे? असा सवाल माजी आमदार, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे विचारला आहे. (Mohan Joshi Pune Congress)
पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांचा सेवाकाळ पूर्ण होऊच दिला जात नाही. प्रशासनातील या सारख्या बदलांमुळे पीएमपी कारभाराची घडी व्यवस्थित बसू दिली जातच नाही. नुकतेच अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका दीपा मुधोळ-मुंडे यांची बदली करण्यात आली. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून केवळ १ वर्ष ४ दिवस एवढ्या काळानंतर त्यांना बदलण्यात आले आहे. त्यांनी पीएमपीमध्ये अतिशय कुशल कारभार करून पीएमपी कर्मचारी आणि प्रवासी यांच्याबरोबर संवाद साधून प्रशासकीय घडी बसविण्याचा प्रयत्न केला होता. पण, अचानक त्यांची बदली करून भाजपने काय साधले? असे, मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
गेल्या ७ वर्षात नयना मुंडे, डॉ.राजेंद्र जगताप, डॉ.कुणाल खेमणार, लक्ष्मीनारायण मिश्रा, ओमप्रकाश बकोरिया, सचिंद्र प्रताप सिंह, डॉ.संजय कोलते असे ७ चांगले प्रशासकीय अधिकारी त्यांचा सेवाकाळ पूर्ण होण्याच्या अगोदरच बदलण्यात आले.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे १०लाख प्रवासी दररोज पीएमपीने प्रवास करतात. या प्रवाशांना सुलभ सेवा मिळणे गरजेचे असताना, तसेच पुणेकरांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, त्यातून सुटका करण्यासाठी सार्वजनिक बस सेवा अधिक सक्षम करणे आवश्यक असताना, ते करण्या ऐवजी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा खेळ सत्ताधारी भाजप करत आहे आणि पुणेकर प्रवाशांना वाऱ्यावर सोडले आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे ठेकेदारांशी गुंतलेले हितसंबंध कारणीभूत आहेत, असाही आरोप माजी आमदार मोहन जोशी यांनी केला आहे.
COMMENTS