Pune PMC Property Tax | अभय योजना आणण्याचा विचार करू नका | सामाजिक संस्था आणि माजी नगरसेवकांची मागणी
PMC Property tax Abhay Yojana – (The Karbhari News Service) – मिळकतकर अभय योजनेचा यापूर्वीचा वाईट अनुभव लक्षात घेऊन नवीन मिळकतकर अभय योजना आणण्याचा विचार रद्द करावा. अभय योजना आणू नका तर महानगरपालिकेचे “भय” निर्माण होईल अशा पद्धतीची कृती करा. अशी मागणी शहरातील सामाजिक संस्था आणि माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
याबाबत सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सांगितले कि, मिळकत कराची वसुली वाढावी यासाठी पुणे महापालिका मिळकत कर थकबाकीदारांसाठी अभय योजना आणण्याचा विचार करत असल्याचे समजते. हा विचारसुद्धा करण्याआधी पुणे महापालिकेने २०२०-२१ व २०२१-२२ या दोन वर्षी आणलेल्या अभय योजनांच्या फलितांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
मिळकतकराची थकबाकी वसूल व्हावी म्हणून पुणे महापालिकेने २०२०-२१ मध्ये अभय योजना आणली होती , या योजनेचा १,४९,६८३ थकबाकीदार मिळकतकर धारकांनी फायदा घेतला व कर भरला , मात्र या प्रक्रियेत महापालिकेने दिलेल्या दंड व व्याजमाफी पोटी महापालिकेचे २१० कोटी रुपयांचे नुकसान झाले. महापालिकेने लगेचच २०२१-२२ मध्ये पुन्हा एकदा मिळकतकराची थकबाकी वसूल व्हावी म्हणून अभय योजना आणली होती , या योजनेचा ६६४५४ थकबाकीदार मिळकतकर धारकांनी फायदा घेतला व कर भरला , मात्र या प्रक्रियेत महापालिकेने दिलेल्या दंड व व्याजमाफी पोटी महापालिकेचे ६४ कोटी रुपयांचे नुकसान झाले. आम्ही त्यावेळीही या योजनांमुळे दरवर्षी प्रामाणिकपणे वेळेवर कर भरणाऱ्या नागरीकांवर याचा परीणाम होतो अशी भिती व्यक्त केली होती आणि थकबाकीदार सोकावतील आणि नवीन अभय योजना येईपर्यंत कर भरणार नाहीत असेही लिहिले होते. दुर्दैवाने आमची भिती खरी ठरली. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे माहिती अधिकारात मी माहिती मागितली की या अभय योजनांचा फायदा घेतलेल्यांपैकी किती मालमत्ता धारक ३१/१२/२०२४ अखेर पुन्हा थकबाकीदार झाले आहेत व त्यांनी कर भरलेला नाही. आलेली माहिती अत्यंत धक्कादायक होती. २०२०-२१ मध्ये ज्या १४९६८३ थकबाकीदार मालमत्ता धारकांनी अभय योजनेचा फायदा घेतला , त्यापैकी ६३५१८ (४२%) मालमत्ता धारक डिसेंबर २०२४ अखेर पुन्हा थकबाकीदार झाले. तर२०२१-२२ मध्ये ज्या६६४५४ थकबाकीदार मालमत्ता धारकांनी अभय योजनेचा फायदा घेतला , त्यापैकी ४४६८५ ( ६७%) मालमत्ता धारक डिसेंबर २०२४ अखेर पुन्हा थकबाकीदार झाले आहेत. असे वेलणकर यांनी म्हटले आहे.
आमची विनंती आहे की या पुर्वानुभवाचा आढावा घेऊन कोणतीही नवीन मिळकतकर अभय योजना आणण्याचा विचारही करू नये. त्यातूनही अट्टाहासाने अभय योजना आणणारच असाल तर याआधीच्या अभय योजनांचा फायदा घेतल्यानंतरही जे मालमत्ताधारक पुन्हा एकदा थकबाकीदार झाले आहेत. त्यांना पुन्हा नवीन योजनेत सहभागी होऊ देऊ नये तसेच जे थकबाकीदार नवीन अभय योजनेत सहभागी होऊ इच्छितात त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरुन घ्यावे ज्यात लाभधारक थकबाकीदार भविष्यात कधीही पुन्हा थकबाकीदार झाला तर आत्ताच्या अभय योजनेत माफी दिलेली दंड व व्याजाची रक्कम त्याच्याकडून वसूल केली जाईल.
—— विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच , पुणे
—
महापालिकेचे “भय” हवे “अभय” नको | माजी नगरसेवक
पुणे महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा कर आकारणी कर संकलन विभागात कर बुडव्यांसाठी ‘अभय योजना ‘ आणण्याचे नियोजन केले जात आहे. १ मार्च ते ३१ मार्च या कालावधीमध्ये ही अभय योजना राबवण्याचे निश्चित झाले आहे असे कळते. त्यामुळे पुणे शहरातील प्रामाणिक “करदाता” जो आहे त्याच्यावर अन्याय होतो आहे. कर बुडवणारी माणसं ही तीच तीच आहेत कर बुडवणाऱ्या लोकांना सन्मान मिळतो, एक नवीन प्रवृत्तीला आपण जन्म देतो कर भरायचा नाही वर्षा दोन वर्षांनी “अभय” योजना आणायची ही एक छोटीशी प्रथा आणि पायंडा पुणे महानगरपालिकेमध्ये पडत आहे. राज्य शासनाने कायद्यामध्ये सुधारणा करून दंडाची रक्कम कमी करावी.
गतवर्षी १२०० प्रॉपर्टी सील केल्या होत्या, यावर्षी २५० देखील नाही. प्रामाणिक पुणेकर “कर” भरणाऱ्याला असे आवाहन करावे लागेल की तुम्ही सुद्धा “कर” भरू नका दंड लागणार नाही, अभय योजना येणार आहे. आपण प्रामाणिकपणे बिल आले नाही तरी “ऑनलाइन” बिल काढून एक महिन्याच्या आत भरून टाकतो तरी आपला सन्मान केला जातच नाही पण कर बुडवणाऱ्या लोकांचा सन्मान केला जातो. महापालिका आयुक्त यांना विनंती आहे कि, अभय योजना आणू नका महानगरपालिकेचे “भय” निर्माण होईल अशा पद्धतीची कृती करा. अशी मागणी माजी नगरसेवक उज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.
COMMENTS