Pune PMC News | निधी अभावी पुणे महापालिकेचे २९ भूसंपादन प्रस्ताव रखडले! | निधी मागणी प्रस्ताव देण्याचे अतिरिक्त आयुक्त यांचे निर्देश!
Omprakash Divate IAS – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी भू संपादनाबाबत आढावा बैठक आज रोजी अतिरिक्त महापालिका आयुक्त ( वि ) ओमप्रकाश दिवटे यांचे दालनात आयोजित केलेली होती. बैठकीमध्ये खालीलप्रमाणे आढावा घेवून निर्देश देण्यात आले. (Pune Municipal Corporation – PMC)
(१) निधी अभावी रखडलेले भूसंपादन प्रस्ताव – भूसंपादन व व्यवस्थापन विभागाकडे निधी अभावी रखडलेल्या २९ प्रकरणांची सखोल चर्चा होवून त्यावर अतिरिक्त महापालिका आयुक्त ( वि) यांनी सदर २९ प्रकल्प व अन्य हाती घेतलेले प्रकल्प विशेषत: रस्ते प्रकल्प व महत्वाकांक्षी महात्मा फुले स्मारक , शिवणे खराडी रस्ता ज्यासाठी निधीची आवश्यकता आहे. त्यास आवश्यक तरतूद शासनकडे मागणी यापूर्वी मागविलेली असेल त्यामध्ये सुधारणा करून निधी मागणी प्रस्ताव करण्याबाबतचे निर्देश दिले.
(२) संयुक्त मोजणीसाठी प्रलंबित असणारी भूसंपादन प्रकरणे – पुणे महानगरपालिकेकडून जिल्हाधिकारी , पुणे यांचेकडे भूसंपादन प्रस्ताव पाठविल्यानंतर संयुक्त मोजणी हा यात महत्वाचा भाग असतो. बहुतांशी प्रकरणांमध्ये संयुक्त मोजणी झाली नसल्याने मिळाल्याने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करणे अडचणीचे होते. याबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी मोजणीवर प्रलंबित असलेल्या प्रकरणांची एकत्रित यादी करून सदरची बाब जिल्हाधिकारी यांचे आढावा बैठकीत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेषत: कात्रज कोंढवा रस्त्याबाबत शासनाकडून निधी प्राप्त असून वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी या ठिक़ाणचे तात्काळ भूसंपादन करणे आवश्यक आहे त्यासाठी पाठपुरावा करावा.
(३) कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या अंतर्गत मिसींग लिंक बाबत – कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या अंतर्गत असलेल्या मिसींग लिंक बाबत भूसंपादन व व्यवस्थापन विभागाकडे प्राप्त झालेले भूसंपादन प्रस्ताव त्वरेने मार्गी लावण्यात यावे. तसेच जे प्रकल्प भूसंपादनासाठी अद्याप प्राप्त झालेले नाहीत याबाबत पथ विभागाशी संपर्क साधून त्यांचेकडून प्रस्ताव उपलब्ध करून घेण्यात यावेत.
(४) व्यपगत झालेल्या भूसंपादन प्रस्तावांबाबत – नवीन भू संपादन कायदा २०१३ अन्वये यापूर्वी चालू असलेली जी प्रकरणे व्यपगत झालेली आहेत त्यांची एकत्रित माहिती विशेष भूमि संपादन अधिकारी क्रं. १५ व १६ यांचेकडून प्राप्त करून घेणे तसेच व्यपगत यादीच्या अनुषंगाने संबंधित विभागास व्यपगत झालेले प्रकल्प नव्याने भूसंपादित करावयाचे आहेत अगर कसे ? याबाबत अभिप्राय घेणेबाबत निर्देश देण्यात आले.
बैठकीस उप आयुक्त ( भू संपादन व व्यवस्थापन , मालमत्ता व्यवस्थापन ) श्रीमती वसुंधरा बारवे , भू संपादन व व्यवस्थापन विभागाकडील उप अभियंता , कनिष्ठ अभियंता , मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडील उप अभियंता व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
COMMENTS