Pune PMC News | पालखी नियोजन बाबत महापालिका आणि पोलिस प्रशासन यांची संयुक्त बैठक!
Palkhi Sohala 2025 – (The Karbhari News Service) – पुणे शहरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन २० जून रोजी होणार असून २२ जून रोजी प्रस्थान होणार आहे. आषाढी पालखी सोहळा सुरळीतपणे पार पडावा यादृष्टीने महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी दिलेल्या निर्देशानुसार पोलिस अधिकारी व पुणे महानगरपालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक बुधवार १८ जून रोजी स्थायी समिती सभागृह येथे ४.३० वाजता आयोजित करण्यात आलेली होती. (Pune Municipal corporation – Pune Police)
बैठकीमध्ये संबंधित विभागांनी पालखी नियोजनाच्या अनुषंगाने केलेल्या कामांबाबतची माहिती दिली. तसेच पोलिस विभागाकडून कळविण्यात आलेली सर्व कामे पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले तसेच खालीलप्रमाणे निर्देश दिले.
पोलिस उप आयुक्त यांनी मंडप , बॅरिकेटिंग, सी.सी.टी.व्ही. संदर्भात तसेच होर्डिंगबाबत सूचना केल्या.
अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पालखी सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व महानगरपालिका विभाग, अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी यांनी स्थानिक पोलिस अधिकारी यांचेशी सातत्याने समन्वय ठेवून काम करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केल्याचे सांगितले व पुढील निर्देश दिले.
वेळोवेळी स्थळ पहाणीवेळी महापालिका आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सर्व कार्यवाही पार पाडल्याची पुन:श्च खात्री करा. सर्व संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांनी पालखी मार्गाची व परिसराची पाहणी करा. काही कामे करावयाची बाकी असतील तर त्यांची त्वरीत पूर्तता करा.
सर्व कर्मचारी त्यांना नेमणूक दिलेल्या जागी उपस्थित राहतील याची दक्षता घ्या.
जो रस्ता वाहतुकीसाठी बंद करावयाचा आहे त्याचेवरील वाहतुक वळवताना चारचाकी वाहने वळवण्यास जागा राहील अशा आधीच्या ठिकाणी , चौकात बॅरिकेट करणेबाबत पोलिसांनी जागा निश्चीत कराव्यात.
पाऊस असल्याने वाहने पार्किंगसाठी मर्यादा आल्यास पर्यायी जागांची पाहणी महापालिका सहायक आयुक्त यांनी करावी. शाळांमध्ये चिखल झाला असल्यास त्या ठिकाणी मुरूम टाकणेची कार्यवाही करावी.
शाळांमध्ये दिंड्यां उतरतात त्या ठिकाणी अग्नीशमन व्यवस्था Fire extinguishers ठेवावी.
म.न.पा. मार्फत सर्व सेवासुविधांचे स्थान दर्शविणारे दिशादर्शक फलक लावण्यात यावेत.
स्वच्छतागृहांची किमान तीनवेळा साफसफाई केली जाईल यांची दक्षता घेण्यात यावी.
पालखी प्रस्थानानंतर सर्व रस्ते त्वरीत स्वच्छ करणेबाबत तसेच ज्या शाळांमध्ये दिंड्या होत्या तेथील व्यवस्थीत स्वच्छता होईल याची दक्षता घ्या.
सी.सी.टी.व्ही. बंद पडू नये यासाठी २४ तास तज्ञ उपलब्ध राहतील याची दक्षता घ्यावी.
पालखी मुक्काम ठिकाणी अखंडितपणे वीजपुरवठा होणेसाठी जनरेटरची व्यवस्था करावी.
पालखी मार्गावर अनधिकृत पथारीवाले यांचेवर अतिक्रमण विभागाने कारवाई करावी.
पालखी मार्गावर ठिकठिकाणी कचरा संकलनासाठी कचरा पेट्यांची व्यवस्था करावी.
पालखी मार्गावरील उर्वरीत अनधिकृत होर्डिंग काढणेबाबतची त्वरीत कारवाई करावी.
पालखी मार्गावरील इलेक्ट्रिक कनेक्शन उघडे नसल्याबाबतची खात्री करावी.
पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून पालखी सोहळा यशस्वी करणेसाठी प्रयत्न करावेत असे निर्देश देण्यात आले.
सदर बैठकीस पोलिस उप आयुक्त ( झोन १ ) निखील पिंगळे , मुख्य अभियंता ( पथ ) अनिरूध्द पावसकर , मुख्य अभियंता ( पाणीपुरवठा ) नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता ( विद्युत ) श्रीमती मनिषा शेकटकर, मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे, उप आयुक्त ( घनकचरा ) संदीप कदम, उप आयुक्त ( परिमंडळ २ ) अरविंद माळी, उप आयुक्त ( आकाशचिन्ह परवाना ) संतोष वारूळे, उप आयुक्त ( परिमंडळ ३ व शिक्षण ) विजय थोरात, उप आयुक्त ( अतिक्रमण ) संदीप खलाटे, सहायक पोलिस आयुक्त – येरवडा प्रांजली सोनवणे, सहायक पोलिस आयुक्त –फरासखाना अनुजा अजित देशमाने, सहायक पोलिस आयुक्त खडकी – विठ्ठल दबडे, तसेच सर्व महापालिका सहायक आयुक्त ( क्षेत्रिय कार्यालये ) उपस्थित होते.
COMMENTS