Pune News | शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्गाचा प्रस्ताव | आठवडाभरात होणार अधिकाऱ्यांची बैठक
| आमदार हेमंत रासनेंनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची भेट
MLA Hemant Rasane – (The Karbhari News Service) – शहराच्या मध्यवर्ती भागातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास अधिक जलद व सोयीस्कर करण्याच्या दृष्टिकोनातून शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या दोन भुयारी मार्गांच्या निर्मितीसाठी आमदार हेमंत रासने यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. या प्रस्तावास गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेत प्रकल्पांच्या मंजुरीसाठी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. (Pune PMC News)
ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळे तसेच प्रमुख बाजारपेठा शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने येथे दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. परिणामी, वाहतूक कोंडी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रस्तावित भुयारी मार्ग हे या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरणार असून, पुणेकरांसाठी हा एक महत्त्वाचा बदल ठरेल.
या प्रस्तावास गती देण्यासाठी हेमंत रासने यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मंजुरीसाठी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, पुढील आठवड्यात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन भोसले यांनी दिले आहे. तसेच, हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असा शब्द दिल्याची माहिती रासने यांनी दिली आहे. खडक येथील रखडलेल्या मामलेदार कचेरीच्या बांधकामाला गती देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.
राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची देखील अधिवेशना दरम्यान भेट घेऊन खडकमाळ येथील पोलिस वसाहतीच्या जीर्ण झालेल्या इमारतींची नव्याने उभारणी करण्याची मागणी रासने यांनी केली आहे.
COMMENTS