Pune Metro Ridership | सप्टेंबर महिन्यामध्ये पुणे मेट्रोच्या दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये मोठी वाढ!
Pune Metro Station – (The Karbhari News Service) – पुणे मेट्रोच्या दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये निरंतर वाढ होताना दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवाच्या काळात पुणे मेट्रोने प्रवासी सेवेच्या वेळेमध्ये वाढ केली होती. या सेवेचा फायदा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात झाला. ऑगस्ट २०२४ मध्ये दैनंदिन प्रवासी संख्या एक लाख अठरा हजार पेक्षा जास्त होती. सप्टेंबर २०२४ मध्ये दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये २५ % पेक्षा जास्त वाढ दिसून आली आहे. सप्टेंबरमध्ये दैनंदिन प्रवासी संख्या १,५३,९७१ इतकी नोंदवण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये एकूण प्रवासी संख्या ४६,१९,१३० इतकी नोंदविण्यात आली आहे. अशी माहिती मेट्रो प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune Metro News)
सप्टेंबर २०२४ मध्ये पुणे मेट्रोला ७.०६ कोटी इतके उत्पन्न मिळाले आहे. दैनंदिन सरासरी उत्पन्न २३ लाख ५६ हजार इतके आहे. एकूण प्रवासी संख्येची विभागणी केली असता पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट या मार्गावर ३५ % प्रवासी संख्या तर रामवाडी ते वनाज या मार्गावर ६५ % प्रवासी संख्या निदर्शनास आली आहे.
पुणे मेट्रोचे तिकीट घेण्यासाठी ७४.७१ % प्रवाशांनी डिजिटल मार्गाचा वापर केला, तर रोख रक्कम घेऊन तिकीट काढण्याची संख्या केवळ २५.२९% आहे. डिजिटल माध्यमातून तिकीट घेणाऱ्यांमध्ये पुणे मेट्रो भारतात सर्वात अग्रेसर आहे. डिजिटल माध्यमाद्वारे तिकीट घेतल्यामुळे कागदाची बचत होऊन पुणे मेट्रोच्या पर्यावरण पूरक उद्दिष्टांना मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. डिजिटल माध्यमांची विभागणी केल्यास असे निदर्शनात आले की, डिजिटल किऑस्कद्वारे १५.१९%, तिकीट वेंडिंग मशीनद्वारे ६.५५%, व्हाट्स ॲपच्या माध्यमातून १९.२३%, मोबाईल ॲपच्या द्वारे ९.९६ % आणि महा मेट्रो कार्डद्वारे १४.५१ % लोकांनी मेट्रोचे तिकीट प्राप्त केले आहे.
त्याच बरोबर सप्टेंबर २०२४ मध्ये पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट पर्यंतच्या मार्गिकेची उद्घाटन माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊन पुणे मेट्रोच्या टप्पा १ चे म्हणजेच पिंपरी – चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट (मार्गिका- १) आणि वनाझ ते रामवाडी (मार्गिका- २)चे काम पूर्ण झाले आहे. स्वारगेट, मंडई, कसबा पेठ ह्या नव्याने सुरु झालेल्या स्थानकांवर प्रवाशांची अद्भुत गर्दी पाहण्यास मिळत आहे. दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी २११३४ प्रवाशांनी ह्या तीन नवीन स्थानकावरून प्रवास केला.
याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (भा. प्र. से) यांनी म्हटले आहे की, “सप्टेंबर २०२४ मधील दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये २५% पेक्षा जास्त वाढ निदर्शनास आली आहे. गणेशोत्सवात नागरिकांनी मेट्रोला मोठी पसंती दिली आहे. २९ सप्टेंबर २०२४ पासून जिल्हा न्यायालय ते स्वारगेट ही भूमिगत मार्गिका सुरु झाली आहे. यामुळे पिंपरी- चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट असा थेट प्रवास करणे शक्य होणार आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी – चिंचवड ही दोन जुळी शहरे जोडली गेली आहेत. याचा प्रवाशांना मोठा फायदा होऊन त्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.”
सर्वात जास्त प्रवासी संख्या असलेली ५ मेट्रो स्थानके
पीसीएमसी – ५८५७५३
पीएमसी – ४६८९१५
रामवाडी – ३९९७७९
पुणे रेल्वे स्टेशन – ३४३७२४
५वनाझ – २७९०४४
COMMENTS