Pune Breaking News – पुणे शहरातील शांततापूर्ण आंदोलनांवरील निर्बंध मागे घ्यावेत | लोकशाही हक्कांचे संरक्षण करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाची मागणी

Homeadministrative

Pune Breaking News – पुणे शहरातील शांततापूर्ण आंदोलनांवरील निर्बंध मागे घ्यावेत | लोकशाही हक्कांचे संरक्षण करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाची मागणी

Ganesh Kumar Mule Jul 21, 2026 8:45 PM

PMC Recruitment Exam Result | पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल  जाहीर | ३१ ऑक्टोबर ला कागदपत्रांची छाननी 
PMC encroachment action | महापालिकेकडून आंबेगाव बुद्रुक मध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाईचा धडाका सुरूच 
Additional Commissioner Vikas Dhakne | विकास ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त मनपा आयुक्त (विशेष) पदाचा पदभार | १४ खात्यांचे कामकाज सोपवले

Pune Breaking News – पुणे शहरातील शांततापूर्ण आंदोलनांवरील निर्बंध मागे घ्यावेत | लोकशाही हक्कांचे संरक्षण करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाची मागणी

 

NCP SP Pune – (The Karbhari News Service) – पुणे शहरात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी, कामगार व नागरिकांच्या आंदोलनांना केवळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच परवानगी देण्याचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा आणि शहरातील विविध ठिकाणी विषयानुरूप शांततापूर्ण आंदोलनांना परवानगी देण्यासाठी पारदर्शक व समान धोरण जाहीर करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), पुणे शहरच्या वतीने पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार यांच्याकडे करण्यात आली.

पक्षाचे पुणे शहराध्यक्ष श्रीकांत विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार वंदना चव्हाण, माजी महापौर अंकुश काकडे, अध्यक्ष हडपसर विधान सभा मतदारसंघ श्री प्रवीण तुपे तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले की, भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य तसेच शांततापूर्ण आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. आंदोलन हा केवळ निवेदन देण्याचा मार्ग नसून लोकशाही व्यवस्थेत जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे आंदोलनांना एका निश्चित ठिकाणी मर्यादित ठेवण्याचा निर्णय हा नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांवर अनावश्यक निर्बंध आणणारा आहे.

पुणे हे सामाजिक चळवळी, प्रबोधन आणि लोकशाही मूल्यांची समृद्ध परंपरा असलेले शहर आहे. महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान समाजसुधारकांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या या शहरात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकारावर मर्यादा आणणे योग्य ठरणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले की, पक्षाचा कायदा व सुव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याची भूमिका कायम आहे. पोलिस प्रशासनाशी सहकार्य करण्याची तयारी असली तरी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांवर गदा येईल, अशी कोणतीही भूमिका स्वीकारली जाणार नाही.

निवेदनातील प्रमुख मागण्या :

* केवळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन करण्याचे धोरण तात्काळ रद्द करण्यात यावे.
* शहरातील विविध भागांमध्ये संबंधित विषयाशी निगडित कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी शांततापूर्ण आंदोलनांना परवानगी देण्यात यावी.
* आंदोलनांसाठी परवानगी देण्याबाबत स्पष्ट, पारदर्शक आणि सर्वांना समान न्याय देणारे धोरण जाहीर करण्यात यावे.
* नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांवर अनावश्यक निर्बंध आणणारी भूमिका तात्काळ मागे घेण्यात यावी.

शहरातील नागरिकांचे लोकशाही हक्क अबाधित राखणे ही प्रशासनाची घटनात्मक जबाबदारी असून, या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), पुणे शहरच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: