Pune Breaking News | जनगणनेच्या कामात अडथळा | पुण्यात  ५ जणांवर विनयभंगासह गुन्हा दाखल  

Homeadministrative

Pune Breaking News | जनगणनेच्या कामात अडथळा | पुण्यात  ५ जणांवर विनयभंगासह गुन्हा दाखल  

Ganesh Kumar Mule May 29, 2026 10:14 PM

PMC Merged 23 Villages | २३ गावांच्या अधिकारा बाबत पाठपुरावा करण्यासाठी एका अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक करावी | माजी नगरसेवकांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 
PMC Pune Recruitment Exam Dates | महापालिका भरती परीक्षा | कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षेच्या तारखा ठरल्या  | जाणून घ्या सविस्तर!
PMC Employees DA Hike | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता लागू | मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी जारी केले सर्क्युलर!

Pune Breaking News | जनगणनेच्या कामात अडथळा | पुण्यात  ५ जणांवर विनयभंगासह गुन्हा दाखल

 

Pune News – (The Karbhari News Service) – राष्ट्रीय जनगणना २०२७ चे कर्तव्य बजावणाऱ्या पुणे महापालिकेच्या महिला प्रगणक व त्यांच्या पथकावर स्वारगेट येथील मिनाताई ठाकरे वसाहतीत काही नागरिकांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शासकीय कामात अडथळा, मारहाण, विनयभंग व चोरीप्रकरणी एकाच कुटुंबातील ५ सदस्यांसह ४ ते ५ अनोळखी लोकांवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune PMC News)

फिर्यादी महिला कर्मचारी पुणे महापालिकेत गेल्या १७ वर्षांपासून शिपाई पदावर कार्यरत असून सध्या त्यांच्याकडे राष्ट्रीय जनगणनेचे काम सोपवण्यात आले आहे.

२७ मे रोजी: दुपारी ३ वाजता मिनाताई ठाकरे वसाहत, गल्ली नं. १४ मध्ये विकास नवनाथ मोरे यांच्या घराची माहिती नोंदवताना त्यांची पत्नी क्रांती मोरे यांनी माहिती देण्यास नकार दिला. शासकीय कामात अडथळा आणून अश्लील शिवीगाळ केली. सहकारी प्रगणक धम्मानंद गायकवाड यांनाही दमदाटी केल्याने पथकाला काम अर्धवट सोडून परतावे लागले.

२८ मे रोजी हिंसक हल्ला: दुपारी १२:३० वाजता काम पूर्ण करण्यासाठी पर्यवेक्षक रमेश जाधव, अतिश चव्हाण व प्रगणक अक्षय बाबर, श्रीकांत गंवडर, आकाश वाघमारे, वैष्णवी शेंडगे यांचे पथक मोरे कुटुंबाच्या समजुतीसाठी गेले. सुरक्षेसाठी फिर्यादींचा मुलगाही सोबत होता. समजूत काढताना आरोपींनी वाद घालून पथक पुढे निघताच मागून हल्ला केला.

आरोपी विकास मोरे, क्रांती मोरे, मुक्ता कसबे, लिलावती मोरे, अभिजीत मोरे व ४ ते ५ अनोळखी व्यक्तींनी पथकाला लाथाबुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण केली. मुख्य आरोपी विकास मोरे याने महिला कर्मचाऱ्याचा हात धरून ब्लाउजची बाही फाडून विनयभंग केला. झटापटीत फिर्यादींचा रेडमी मोबाईल, फास्टट्रॅक घड्याळ व गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून घेण्यात आली. फिर्यादींच्या मुलालाही गंभीर मारहाण करून हाताच्या अंगठ्याला चावा घेऊन जखमी करण्यात आले, अशी तक्रार देण्यात आली आहे.

घटनेनंतर मनपा कर्मचाऱ्यांनी स्वारगेट पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा, विनयभंग, दुखापत करणे व चोरीच्या कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुजाता जाधव करत आहेत.

कर्मचारी वर्गात तीव्र संताप

राष्ट्रीय महत्त्वाच्या कामावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे महापालिका कर्मचारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. जनगणनेसारख्या कामात अडथळा आणणाऱ्या व महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
पुणे महापालिकेनेही या घटनेचा निषेध करून कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. जनगणनेचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: