Protein for Health | केक खाता, परंतु, प्रथिने (Protein) चांगली की वाईट विचारता!
| डॉ. मनन व्होरा यांचे वाचकांना निरोगी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन
Healthy Lifestyle – (The Karbhari News Service) – ‘वाढदिवसाला भरभरून साखर असलेल्या ‘केक’सह गोडाधोडाचे खाद्यपदार्थ लोक आवडीने खातात, परंतु ‘प्रथिने’ खाणे चांगले की वाईट ते विचारतात. वास्तविक सर्व वयोगटातील व्यक्तींनी ‘प्रथिनां’चे सेवन केले पाहिजे,’ असे सांगत प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ आणि क्रीडा वैद्यक तज्ज्ञ डॉ. मनन व्होरा यांनी वाचकांना निरोगी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन केले.
‘पुणे पुस्तक महोत्सवा’त मंगळवारी ‘लिटररी कॉर्नर’ येथे डॉ. मनन व्होरा लिखित ‘बट व्हॉट डज सायन्स से’ या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. समाजमाध्यमातून आरोग्याविषयी अनेक चुकीची माहिती, गैरसमज पसरविले जातात. मासिक पाळीच्या वेदना, नैराश्य, वजन कमी करणे.. अशा अनेक मुद्द्यांबाबत स्वयंघोषित तज्ज्ञ मते मांडतात. मात्र, सत्य काय आहे, विज्ञान काय सांगते, याबाबत आपण अनभिज्ञ असतो. डॉ. मनन व्होरा यांनी आपल्या पुस्तकातून अशा अनेक मिथके-गैरसमजांचे विनोदी शैलीत खंडन केले आहे. त्या अनुषंगाने डॉ. मनन व्होरा यांनी प्रथिने, कर्बोदके किती खावी, फळे खाण्याची योग्य वेळ कोणती, फोन किती वेळ वापरावा, अशा विविध विषयांवर वाचकांच्या प्रश्नांना नर्मविनोदी उत्तरे दिली. ‘आरोग्याशी संबंधित विषयांवर समाजमाध्यमात ‘व्हिडिओ’ तयार केले होते. त्यापासून अनेकांनी प्रेरणा घेत आपली जीवनशैली बदलली. काहींनी मद्यपान, ध्रूमपान सोडले, तर काही जणांनी नियमित व्यायाम सुरू केला. भारतीयांनी आनंदी आणि निरोगी आयुष्य जगावे, या प्रेरणेतून हे पुस्तक लिहिले आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
….
‘कविता लिहिणे म्हणजे बगीचा फुलविणे’
‘कविता लिहिणे ही बीजांपासून बगीचा फुलविण्याची प्रक्रिया आहे, जिथे रंगीबेरंगी फुले उमलतात,’ अश शब्दांत कर्नल कांचन भट्टाचार्य यांनी कविता लेखनाची प्रक्रिया उलगडली. निमित्त होते, ‘रिदम्स अँड रिफ्लेक्शन : ए जर्नी थ्रू पोएट्री’ या संवाद कार्यक्रमाचे. पुणे पुस्तक महोत्सवात ‘लिटररी कॉर्नर’ येथे कर्नल आशिष रायसिंघानी यांनी कर्नल भट्टाचार्य यांच्याशी संवाद साधला. ‘सोळाव्या वर्षी कविता लिहिल्यानंतर तब्बल तीस वर्षे सैन्यदलात देशसेवा केली. त्यामुळे कविता लिहायला वेळच नव्हता. सैन्यात असताना तुकडीच्या मासिकाचे संपादन करायचो. निवृत्त झाल्यानंतर कविता लेखन सुरू केले. आता माझे सातवे पुस्तक प्रकाशित झाले असून, नवकवींनी ‘जस्ट डू इट’ या मंत्रानुसार लेखन करत राहावे,’ असा सल्लाही त्यांनी दिला. या प्रसंगी कर्नल आशिष रायसिंघानी यांनी आपल्या पुस्तकाची माहिती दिली.
COMMENTS