PMC Ward Structure Objections and Suggestions | प्रभाग क्रमांक १५ आणि प्रभाग क्रमांक ३४ या प्रभागातून सर्वात जास्त हरकती-सूचना
| क्षेत्रीय कार्यालयापेक्षा निवडणूक कार्यालयाकडे हरकती नोंदवण्याबाबत नागरिकांचा कल
PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका निवडणुकी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. तसेच त्यावर नागरिकांना हरकती आणि सूचना देण्यासाठी ४ सप्टेंबर पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. त्यानुसार नागरिकांनी प्रतिसाद देणे सुरू केले आहे. मात्र इतर कुठल्या प्रभाग पेक्षा प्रभाग १५ म्हणजे मांजरी बुद्रुक साडेसतरा नळी आणि प्रभाग ३४ नर्हे वडगाव बुद्रुक या दोन प्रभागातून सर्वात जास्त हरकती-सूचना प्रशासनाकडे आल्या आहेत. तर आतापर्यंत एकूण ३९६ हरकती सूचना आल्या आहेत. अशी माहिती उपायुक्त प्रसाद काटकर (Prasad Katkar PMC) यांनी दिली. (Pune Corporation Election 2025)
महापालिका निवडणूक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार प्रभाग १५ अर्थात मांजरी बुद्रुक – साडेसतरा नळी प्रभागात आतापर्यंत १६० हरकती सूचना आल्या आहेत. त्यातील १३४ हरकती या २५ ऑगस्ट या दिवशी आल्या आहेत. त्या खालोखाल प्रभाग क्रमांक ३४ म्हणजे नर्हे वडगाव बुद्रुक या प्रभागातून १२६ हरकती सूचना आल्या आहेत. त्यातील ७३ हरकती या २८ ऑगस्ट आणि ३४ हरकती या २७ ऑगस्ट या दिवशी आल्या आहेत. बाकी इतर प्रभागातून तुलेनेने कमी हरकत आल्या आहेत. यात कोरेगाव पार्क मुंढवा प्रभागातून १५, पुणे स्टेशन जय जवान नगर १३, कमला नेहरू हॉस्पिटल रास्ता पेठ १० शिवणे खडकवासला ८ अशा हरकती आणि सूचना आल्या आहेत. प्रभागाची नैसर्गिक रचना, जुना तोडलेला प्रभाग अशा स्वरूपाच्या या हरकती आहेत.
२२ ऑगस्ट पासून हरकती नोंदवण्यात सुरुवात झाली असली तरी २५ पासून हरकती देण्याचा वेग वाढला. सर्व प्रभागातील ऑगस्ट ला १६५, २६ ला ४२, २७ ला ३८, २८ ला १०३ तर २९ ऑगस्ट ला ४३ हरकती दाखल झाल्या आहेत. अशा आतापर्यंत एकूण ३९३ हरकती आणि सूचना दाखल झाल्या आहेत.
दरम्यान सर्व क्षेत्रीय कार्यालयात हरकती आणि सूचना देण्याची सुविधा उपलब्ध असली तरीही नागरिकांनी निवडणूक कार्यालयाकडे हरकती देण्यास पसंती दर्शवली आहे. कारण ३९६ पैकी २९४ हरकती आणि सूचना या निवडणूक कार्यालयाकडे नोंदवण्यात आल्या आहेत. असे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

COMMENTS