PMC Ward No 2 | प्रभाग दोन मधील समस्यांच्या निराकरणासाठी निधी उपलब्ध करा
| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मागणी
PMC Ward no 2 – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या समस्या सोडविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली.
प्रभाग दोन मधील विविध समस्यांबाबत डॉ. धेंडे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांची पुण्यात भेट घेतली. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या वेळी बाळासाहेब जानराव, नानदेवराव घाडगे, शेखर शेंडे, क्रांती शितोळे, मेजर रणपिसे, विजय कांबळे, गजानन जागडे, अनिल कांबळे, गणेश पारखे, ज्ञानेश्वर बाबर, अनिल राउत, मेश्राम, निरंजन मराठे आदीसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
या वेळी डॉ. धेंडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, प्रभाग क्रमांक दोन मधील सरकारी वसाहतीमध्ये विविध नागरी समस्या आहेत. विशेषत: जेल वसाहत, पाटबंधारे वसाहत, मनोरुग्णालय वसाहत, पोलीस लाईन, भिक्षेकरी केंद्र या वसाहतींमध्ये या समस्या भेडसावत आहेत. विविध नागरी समस्यांकरिता केंद्र व राज्य शासनाचा फक्त निधी वापरला जातो. पुणे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत या सर्व वसाहतीमधील नागरी समस्यांचे निवारण होणे आवश्यक आहे. त्या साठी आपण प्रयत्न करावा, अशी मागणी करण्यात आली.
या बरोबरच प्रभागातील पावसाळी नाले या आळंदी रोड मधील आंबेडकर चौक येथून रक्षा मंत्रालयाच्या बीईजी यांच्या भूभागामधून नैसर्गिक नाला जात होता. त्याकरिता पुणे महापालिकेच्या वतीने त्यांच्या बरोबर पत्र व्यवहार करून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह पूर्ववत होण्याकरिता पाठपुरावा चालू आहे. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून या कामास गती द्यावी. नागरी हवाई मंत्री यांच्या अधिकाऱ्यांबरोबर पुणे विमानतळ हे कार्यान्वित केले आहे. ते स्वागतार्ह आहे. परंतु या विमानतळाला ये-जा करणारी वाहने ही प्रभाग क्रमांक दोन आणि तीन मधील ५०९ चौक ते नागपूर चाळ या रस्त्यावरून जात आहेत. गेल्या दहा वर्षापासून संबंधित रस्ता हा १०० फुटी विकास आराखड्यात करावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वायू सेनेकडून सदरील रस्त्याकरिता जागा ताब्यात घेण्याकरिता पाठपुरावा चालू आहे. वायू सेनेचे अधिकारी व महापालिका आयुक्त यांच्या बरोबर बैठक देऊन हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली.
या बरोबरच नागपूर चाळ, फुलेनगर या प्रभागामध्ये केंद्र शासनाशी संबंधित विषयकरिता अधिकाऱ्यांसमवेत जागा पाहणी करून बैठकीचे आयोजन करावे. ते विषय पुढील प्रमाणे आहेत. त्या मध्ये अग्रेसन शाळेपासून ई कॉमरझोन चौकापर्यंत विकास आराखड्यामधील रस्ता हा सर्वे ऑफ इंडिया या केंद्रीय शासनाच्या अधिपत्याखालील संस्थेच्या ताब्यात आहेत. तेथे भू-संपादनाकरिता त्यांनी तत्वता मान्यता दिलेली आहे. त्या बाबत दिल्लीमध्ये अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करून संबंधित खात्याकडून जागा ताब्यात मिळविण्यासाठी निर्णय घ्यावा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड (समता नगर) येथील म्हाडाच्या जुन्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. राज्य शासनाने या इमारतींच्या पुनर्विकासाकरिता अध्यादेश जारी केलेला आहे. परंतु या इमारतींच्या उत्तरेला भारतीय वायुसेना यांची हद्द असल्याने तेथे बांधकाम करण्यास नाहरकत मिळणे गरजेचे आहे. त्यावर अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून मार्ग काढावा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड (समता नगर) येथील योगा केंद्राच्या उर्वरित कामाकरिता खासदारकिचा विशेष निधी देऊन काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी करण्यात आली
या बाबत सकारात्मक विचार करून कार्यवाही करण्याचे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी दिले, अशी माहिती डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली.