PMC Standing Committee | महापौर चषक क्रीडा स्पर्धेसाठी तीन कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीला स्थायी समितीची मान्यता

Homeadministrative

PMC Standing Committee | महापौर चषक क्रीडा स्पर्धेसाठी तीन कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीला स्थायी समितीची मान्यता

Ganesh Kumar Mule Mar 13, 2026 7:21 PM

Pune Municipal Corporation Security Guard | पुणे महापालिका राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेणार 100 सुरक्षारक्षक
Unseasonal Rain | Maharashtra News | राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाने अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित
Naval Kishore Ram IAS | नदी पात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर गुन्‍हे दाखल होणार – पुणे महापालिका आयुक्‍त नवलकिशोर राम यांच्‍या अधिकाऱ्यांना सूचना

PMC Standing Committee | महापौर चषक क्रीडा स्पर्धेसाठी तीन कोटी ८७ लाख रुपयांच्या निधीला स्थायी समितीची मान्यता

| १९ क्रीडा स्पर्धांचे आयोजन | स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापौर चषक क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी सुमारे तीन कोटी ८७ लाख रुपयांच्या खर्चाला शुक्रवारी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)

महापालिकेतर्फे महापौर चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात १३ जिल्हास्तरीय व सात राज्यस्तरीय १९ विविध क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. या स्पर्धांच्या आयोजनासाठी विविध क्रीडा संघटनांकडून खर्चाचे अंदाजपत्रक मागविण्यात आले होते. त्यानुसार सादर झालेल्या अंदाजपत्रकांची क्रीडा विभागाकडून तपासणी करून संघटनांना खर्च देण्यासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांनी मान्यता दिली आहे. २०२५-२६ च्या अंदाजपत्रकाप्रमाणे या स्पर्धेच्या आयोजनासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद आहे. मात्र, ही रक्कम अपुरी असल्याने स्पर्धेचा कालावधी पाहता क्रीडा विभागाकडील उपलब्ध अन्य तरतुदींमधील रक्कम उपलब्ध करून घेण्यात येणार आहे, असे भिमाले म्हणाले.

स्पर्धा आयोजनासाठी आयोजक संस्थांनी सादर केलेल्या बिलांची तपासणी करून एक कोटी ३२ लाख २५ हजार ८९० रुपयांपर्यंतच्या खर्चास, विविध स्पर्धांमधील विजेते, उपविजेते, प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंना एक कोटी ७४ लाख तीन हजार रुपयांपर्यंतचा प्रत्यक्ष खर्च देण्यास मान्यता देण्यात आली आहे. विविध स्पर्धांच्या पंचांना मानधन देण्यासाठी २१ लाख ७४ हजार रुपयांपर्यंतच्या प्रत्यक्ष खर्चासाठी तसेच खेळाडू, पंच, मदतनीस यांना चहा, नाश्ता, जेवण पुरविण्यासाठी भांडार विभागामार्फत निविदादारांना ३८ लाख ५० हजार रुपयांपर्यंतचा प्रत्यक्ष खर्च देण्यास मान्यता देण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना मेडल्स, ट्रॉफीज देण्यासाठी १५ लाख रुपयांपर्यंतचे बिल अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

स्पर्धेचे उद्घाटन, समारोप व अन्य कार्यक्रमांचे आवश्यकतेनुसार चित्रीकरण, फोटो काढण्यासाठी प्रत्यक्ष कामानुसार १५ लाख रुपयांपर्यंतचे बिल अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.स्पर्धेच्या जागी मंडप, व्यासपीठ, टेबल खुर्च्या व अन्य साहित्य भवन विभागामार्फत पुरवले जाणार आहे. त्यासाठी भवन विभागाच्या निविदाधारकांना प्रत्यक्ष होणारा खर्च देण्यात येणार आहे. स्पर्धांच्या ठिकाणी सर्व प्रकारची विद्युत व्यवस्था, ध्वनी यंत्रणा आदी व्यवस्था विद्युत विभागाच्या ठेकेदारामार्फत करून त्याचा खर्च देण्यास मान्यता देण्यात आली आहे. स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना  ट्रॅकसूट खरेदी करण्यासाठी प्रत्यक्ष होणारा खर्च देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे शहरातील प्रतिभावान खेळाडूंना आपले कौशल्य दाखवायची संधी मिळेल, असा विश्वास भिमाले यांनी व्यक्त केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: