PMC Standing Committee | वानवडीतील तीन पुलांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीचा मार्ग मोकळा | स्थायी समितीची मान्यता

Homeadministrative

PMC Standing Committee | वानवडीतील तीन पुलांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीचा मार्ग मोकळा | स्थायी समितीची मान्यता

Ganesh Kumar Mule Jun 26, 2026 7:29 AM

PMC Pune | खोदाई शुल्का पोटी मनपा तिजोरीत चालू आर्थिक वर्षात 254 कोटी जमा | अजून 100 कोटी जमा होण्याची अपेक्षा
Irrigation Dept Vs PMC | पाणी बिलाचा वाद महापालिकेच्या अंगलट! पाटबंधारे विभागाकडून अडवणूक करत दोन गावांचे पाणी तोडले
NCP Youth Kothrud | सुप्रिया सुळे यांच्याबद्दल चुकीचे विधान केल्याबद्दल कोथरूड युवक राष्ट्रवादी ची अब्दुल सत्तर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

PMC Standing Committee | वानवडीतील तीन पुलांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीचा

मार्ग मोकळा | स्थायी समितीची मान्यता

 

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) –  वानवडी परिसरातील वाहतूक आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या तीन नव्या पुलांच्या उभारणीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) नियुक्त करण्याचा प्रस्तावाला पुणे महापालिकेने स्थायी समितीने मंजुरी दिली. निविदा प्रक्रियेनंतर मे. स्ट्रक्टसोर्स इंजिनिअरिंग सोल्युशन्स या संस्थेची नियुक्ती करण्याची शिफारस प्रशासनाने केली असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (Pune Municipal Corporation – PMC)

प्रभाग क्रमांक २५ अंतर्गत वानवडीतील काळुबाई मंदिर ते अभ्युदय सोसायटी, वानवडी ताडीमळा तसेच भैरोबा नाला परिसरात नवीन पूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांसाठी प्री-टेंडर आणि पोस्ट-टेंडर प्रक्रियेतील तांत्रिक कामकाज तसेच प्रत्यक्ष बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.

पथ विभागाचे मुख्य अभियंत्यांनी यासाठी निविदा मागविल्या होत्या. एकूण १३ संस्थांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला. तांत्रिक छाननीनंतर तीन संस्था पात्र ठरल्या. त्यानंतर गुणवत्ता आणि खर्च आधारित निवड पद्धती वापरून अंतिम मूल्यांकन करण्यात आले.

निविदा प्रक्रियेत पेव्हेटेक कन्सल्टिंग इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा. लि. आणि एन्व्हायरोसेफ कन्सल्टंट्स प्रा. लि. या संस्थाही पात्र ठरल्या होत्या. मात्र गुणांकनात मे. स्ट्रक्टसोर्स इंजिनिअरिंग सोल्युशन्स आघाडीवर राहिली.

या कामासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात संबंधित तरतूद उपलब्ध असून तज्ज्ञ सल्लागारांची फी त्यातून अदा करण्यात येणार आहे. गुणवत्ता तपासणी आणि प्रकल्प देखरेखीसाठी सुमारे तीन कोटी रुपयांची तरतूद असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी स्थायी समितीकडे सादर केलेल्या प्रस्तावात मे. स्ट्रक्टसोर्स इंजिनिअरिंग सोल्युशन्स यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यास तसेच त्यांच्या दरानुसार करारनामा करण्यास मंजुरी देण्याची विनंती करण्यात आली होती.


पुणे-सोलापूर रस्ता, शिवरकर रस्ता विकासासाठी सल्लागार नियुक्तीचा मार्ग मोकळा ; स्थायी समितीची मंजुरी

 

पुणे कॅन्टोनमेंट हद्दीतील कॅन्टोनमेंट कार्यालय ते भैरोबा नाला दरम्यानच्या पुणे-सोलापूर रस्त्याच्या पुनर्बांधणीसह शिवरकर मुख्य रस्ता विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. गुणवत्ता आणि खर्च आधारित निवड प्रक्रियेनंतर मे.स्ट्रक्टसोर्स इंजिनिअरिंग सोल्युशन्स या संस्थेची निवड करण्यात आली आहे.

या प्रकल्पांतर्गत जुन्या व नादुरुस्त झालेल्या पुणे-सोलापूर रस्त्याचे पुनःडांबरीकरण, पावसाळी जलवाहिनींसह रस्त्याचे आधुनिकीकरण तसेच शिवरकर मुख्य रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या प्री-टेंडर आणि पोस्ट-टेंडर प्रक्रियेसह प्रत्यक्ष कामांवर तांत्रिक देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्याची प्रक्रिया महापालिकेच्या पथ विभागामार्फत राबविण्यात आली. या प्रकल्पासाठी आमदार सुनील कांबळे यांच्याकडून पाठपुरावा केला जात असल्याचे भिमाले म्हणाले.

या निविदा प्रक्रियेत एकूण दहा संस्थांनी सहभाग घेतला होता. तांत्रिक छाननीनंतर तीन संस्था पात्र ठरल्या. त्यानंतर गुणवत्ता आणि खर्च आधारित निवड पद्धतीनुसार गुणांकन करण्यात आले. महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात गुणवत्ता तपासणी आणि तज्ज्ञ सल्लागारांच्या शुल्कासाठी संबंधित बजेट कोडवर तीन कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध आहे. त्यातून या सल्लागाराची फी अदा करण्यात येणार आहे.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी सादर केलेल्या प्रस्तावात स्ट्रक्टसोर्स इंजिनिअरिंग सोल्युशन्स यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यास तसेच त्यांच्या दरानुसार करारनामा करण्यास मंजुरी देण्याची विनंती केली होती.

दरम्यान, पुणे-सोलापूर मार्ग हा शहरातील प्रमुख वाहतूक मार्गांपैकी एक मानला जातो. रस्त्याची खराब अवस्था, पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्या आणि वाढती वाहतूक लक्षात घेता या विकासकामाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या निर्णयामुळे या प्रकल्पाच्या कामाला वेग येणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0