PMC Standing Committee | पाणीपुरवठा, पूरनियंत्रणासाठी महापालिका घेणार १,१६७ कोटींचे कर्ज | स्थायी समितीची मान्यता

Homeadministrative

PMC Standing Committee | पाणीपुरवठा, पूरनियंत्रणासाठी महापालिका घेणार १,१६७ कोटींचे कर्ज | स्थायी समितीची मान्यता

Ganesh Kumar Mule Aug 14, 2026 7:20 PM

Water Closure | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार
E Waste – Green Byte | शहरातील ई-कचरा (E-Waste) व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी “Green Byte” प्रकल्पाचे आयोजन
PMC Election Final Ward Structure | पुणे महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर  | ८ प्रभागांची नावे बदलली | १३२९ हरकती मान्य केल्या 

PMC Standing Committee | पाणीपुरवठा, पूरनियंत्रणासाठी महापालिका घेणार १,१६७ कोटींचे कर्ज | स्थायी समितीची मान्यता

| समाविष्ट गावांतील मलनिस्सारणाचाही समावेश

 

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) –  शहरातील पाणीपुरवठा, पूरनियंत्रण आणि समाविष्ट गावांतील मलनिस्सारण या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी पुणे महापालिका १ हजार १६७ कोटी रुपयांचे व्यावसायिक कर्ज घेणार आहे. या कर्ज प्रस्तावाला स्थायी समितीने शुक्रवारी मान्यता दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (Pune PMC News)

महापालिकेने यापूर्वी २०१७ मध्ये समान पाणीपुरवठा योजनेसाठी २०० कोटी रुपयांचे म्युनिसिपल बाँड उभारले होते. त्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीयीकृत व अनुसूचित बँका तसेच वित्तीय संस्थांकडून स्पर्धात्मक पद्धतीने कर्ज प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत.

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या १२ गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये नऱ्हे, आंबेगाव खुर्द, नांदेड, नांदोशी, सणसनगर, किरकटवाडी, धायरी, उंड्री, आंबेगाव बुद्रुक, मांगडेवाडी, निळोठेवाडी आणि भिलारेवाडी या गावांचा समावेश आहे. या गावांसाठी २०० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. सुमारे ७१ किलोमीटरची ट्रान्समिशन लाइन, वितरण जाळे आणि मीटरिंगची कामेही केली जाणार आहेत.

या पाणीपुरवठा योजनेचा एकूण खर्च सुमारे ८९० कोटी रुपये असून, त्यासाठी कर्जातून ४४५ कोटी रुपये उभारण्याचे नियोजन आहे.

शहरातील नाले रुंदीकरण व खोलीकरण, कल्व्हर्ट तसेच पाईप ड्रेनची कामे करण्यासाठी पूरनियंत्रण प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ४०० कोटी रुपये असून, त्यासाठी कर्जातून २०० कोटी रुपये उभारले जाणार आहेत.

समाविष्ट सात गावांमध्ये मलनिस्सारण व्यवस्था उभारण्यासाठीही कर्जाचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे १ हजार ४४ कोटी रुपये असून, त्यासाठी कर्जातून ५२२ कोटी रुपये उभारण्याचे नियोजन आहे. या अंतर्गत ३५७ किलोमीटरचे सीवर नेटवर्क उभारले जाणार असून, मांजरी येथे ४५ एमएलडी आणि होळकरवाडी येथे १८.५ एमएलडी क्षमतेचे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या अंदाजपत्रकात २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी कर्जफेडीसाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कर्जाचा कालावधी, व्याजदर आणि परतफेडीच्या अटी स्पर्धात्मक प्रस्तावांच्या आधारे निश्चित करण्यात येणार आहेत.

प्रकल्पांसाठी प्रस्तावित कर्ज
समाविष्ट १२ गावांची पाणीपुरवठा योजना : ४४५ कोटी रुपये
पूरनियंत्रण प्रकल्प : २०० कोटी रुपये
समाविष्ट सात गावांतील मलनिस्सारण : ५२२ कोटी रुपये
एकूण कर्ज : १ हजार १६७ कोटी रुपये

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: