PMC Solid Waste Management Department | घनकचरा विभागाच्या ई-कचरा संकलन मोहिमेत २२०६ किलो कचऱ्याचे संकलन!
E waste – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation – PMC) क्षेत्रिय कार्यालयांतर्गत दैनंदिन स्वच्छता विषयक कामकाजाबरोबरच सिंगल युज प्लास्टिक बंदी अंमलबजावणी बाबत जनजागृती व कारवाई, प्लास्टिक संकलन मोहीम, ई-कचरा संकलन मोहीम अशा विविध स्वच्छता विषयक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्या अनुषंगाने ई-कचरा समस्येविषयी जनजागरण करणे आणि जास्तीत जास्त रिसायकलिंग होण्याच्या दृष्टीने संकलनाची नियोजित व्यवस्था लावणेकरीता शनिवार रोजी १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत व मनपा मुख्य इमारतीमध्ये ई- कचरा संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (Sandip Kadam PMC) यांनी दिली. (Pune PMC News)
यासाठी क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व आरोग्य कोठ्यांवर नागरीकांना ई-कचरा संकलनाकरीता संकलन केंद्र उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये कमिन्स इंडिया फाऊंडेशन, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह, जनवाणी अशा विविध सामाजिक संस्था तसेच, ब्रॅन्ड अॅम्बॅसीडर्स, मोहल्ला कमिटी व अपेक्स कमिटी सदस्य यांना देखील या अभियानामध्ये सहभागी करून घेण्यात आले.
सर्व खात्यांतर्गत निर्माण होणारा सर्व ई-कचरा घोलेरोड कचरा हस्तांतरण केंद्र याठिकाणी संकलित करून सदरील ई-कच-यावर प्रक्रिया व पुर्नवापर प्रकल्प पुणे मनपा, श्रीमती. शामलाताई देसाई अध्यक्ष NSCC, पुणे व इलेक्ट्रोफाईन कंपनी यांचे संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्वावर घोले रोड कचरा रँम्प येथे करण्यात येत आहे.
या अभियानानंतर भविष्यात शहरामध्ये कायमस्वरूपी संकलन केंद्र चालवले जातील असा प्रयत्न केला जाणार आहे. याद्वारे ई-कचरा व प्लास्टिकच्या समस्येवर तोडगा निघून कचरा शास्त्रीयदृष्ट्या विल्हेवाट लागू शकेल.
१५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत व मनपा मुख्य इमारतीमध्ये घेण्यात आलेल्या ई-कचरा संकलन मोहिमेद्वारे एकूण २२०६.९ किलो ई-कचरा संकलित करण्यात आला व ई-कच-यावर पुणे महानगरपालिकेमार्फत शात्रोक्त पद्धतीने प्रकिया करण्याच्या अनुषंगाने पुढील नियोजन करण्यात आले.
COMMENTS