PMC Security Department | पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागाच्या ३७५ जागा रिक्त! | महापालिकेच्या विविध प्रॉपर्टी ची सुरक्षा रामभरोसे
| कंत्राटी कर्मचारी घेण्याची खात्याची शिफारस; मात्र प्रस्ताव पडून!
Pune PMC Security Guard – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागाच्या (PMC Security Department) कायम पदावरील ३७५ जागा रिक्त आहेत. महापालिका हद्दीत समाविष्ट झालेली ३४ गावे तसेच विविध संपत्तीचे संरक्षण करण्यात सुरक्षा विभागाला अडचणी येत आहेत. त्यामुळे विभागाने अतिरिक्त ४०० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने घेण्याची मागणी केली आहे. याला अतिरिक्त आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र महापालिका आयुक्त स्तरावर याचा निर्णय होत नसल्याने हा प्रस्ताव गेल्या कित्येक महिन्यापासून तसाच पडून आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रिय कार्यालये, आरोग्य केंद्रे (दवाखाने), जलकेंद्रे, सांस्कृतीक केंद्रे, क्रीडांगणे, स्मशानभुमी, कचरा हस्तांतरण केंद्र, मैलापाणी शुध्दीकरण केंद्र, उदयाने, वसतिगृह इत्यादी ठिकाणी सुरक्षा विभागामार्फत कामगार उपलब्ध करुन देणेबाबत सुरक्षा विभाग कार्यालय खात्याने निवेदन सादर केले आहे.
सुरक्षा विभागाच्या वतीने आवश्यक आणि नव्याने वाढीव २५० व १५० अतिरीक्त (बफर) असे एकुण ४०० बहुउद्देशीय कामगारांना घेणेकामी निवेदन अतिरिक्त आयुक्त यांच्यासमोर ठेवले होते. त्यास अतिरिक्त आयुक्त यांनी सकारात्मक अभिप्राय दिला आहे. दरम्यान समाविष्ट गावामुळे विविध खात्यानी सुरक्षा रक्षक घेण्याची मागणी केली आहे. त्यानुसार वाढीव ४०० कर्मचारी घेण्याबाबत खात्याने प्रस्ताव सादर केला होता. मात्र आयुक्तांनी याबाबत फेर निवेदन सादर करण्याचे आदेश दिले होते.
सुरक्षा विभागाकडे १ मुख्य सुरक्षा अधिकारी, ३ सुरक्षा अधिकारी, ६ सहाय्यक सुरक्षा अधिकारी, ६६६
सुरक्षा रक्षक व १४ जमादार अशी शेड्युल मान्य पदे आहेत. यामधील सदयस्थितीस सुरक्षा रक्षकांच्या कायम पदावरील जागा विविध कारणामुळे रिक्त आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता व विविध मिळकतींचे जतन व संरक्षणसाठी २९१ सुरक्षा रक्षकांना मदत करण्यासाठी १५६५ बहुउद्देशीय कामगारांना कंत्राटी पध्दतीने नेमण्यात आलेले आहे. सन २०१७-१८ पासून ते सन २००३-२००३ या आर्थिक वर्षापर्यंत १६६५ बहुउद्देशीय कामगारांची विहित कार्यप्रणालीनुसार मान्यता घेण्यात आली होती. तथापि सन २००३-२४ या आर्थिक वर्षात १६६५ बहुउद्देशीय कामगारांपैकी १०० कंत्राटी बहुउद्देशीय कामगार कमी करण्यात येऊन १५६५ बहुउद्देशीय कामगार घेणेस मान्यता स्थायी समिती व प्रशासकीय मान्यतेने देण्यात आली.
सन १९९२ मध्ये सुरक्षा विभागाकडे सुरक्षा रखवालदार संख्या ६४१ इतकी होती. तदनंतर २००४ साली ६४१ वरून ६६६ इतकी वाढ करण्यात आली. राज्यशासनाच्या धोरणानुसार सन २०१० पासुन वर्ग-४ ची सरळ पदभरती बंद करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षकांची बढती, मयत व सेवानिवृत्त या कारणांमुळे सध्या सुरक्षा विभागाकडे आजअखेर कायमस्वरूपी २९१ सुरक्षा रक्षक कामास आहेत.
सध्या ६६६ पैकी २९१ कार्यरत सेवक असुन त्यांचे वेतनावरील दरमहा खर्च १.८४ कोटी इतका होत आहे. ३७५ रिक्त जागी कायम स्वरूपी पदभरती केल्यास त्यांचे वेतनावर दरमहा १ कोटी ५ लाख इतका खर्च होणार आहे. त्याऐवजी त्यांचे जागी ४०० कंत्राटी सुरक्षा रक्षक घेतल्यास त्यांचे वेतनावर दरमहा ९२ लाख रुपये इतका खर्च होणार आहे. कायम सेवक घेणेऐवजी कंत्राटी सेवक घेतल्यास पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागाची अर्थिक बचत होणार आहे. असे खात्याने म्हटले आहे. खात्याने म्हटले आहे की, यासाठी विभागाकडे निधी देखील आहे. मात्र गेल्या कित्येक महिन्यांपासून हा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्या टेबलवर पडून आहे. त्यामुळे याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही.
—-
सुरक्षा रक्षक घेण्याबाबत आयुक्त यांच्याकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे. आयुक्त आमच्या प्रस्तावाला मान्यता देतील, असा विश्वास आहे.
– राकेश विटकर, सुरक्षा अधिकारी.
COMMENTS