PMC Sahityik Katta | अण्णा भाऊ साठे जागतिक दर्जाचे साहित्यिक | वि.दा. पिंगळे
Pune – (The karbhari News Service) – महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती पुरस्कृत साहित्यिक कट्टा वारजे आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने वारजे या ठिकाणी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे एक पुरोगामी साहित्यिक या विषयावर सुप्रसिद्ध साहित्यिक आणि वक्ते,मसाप पुण्याचे कार्यवाह मा.वि.दा .पिंगळे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
याप्रसंगी बोलताना वि.दा .पिंगळे म्हणाले अण्णा भाऊ साठे यांनी मराठी साहित्याचा केंद्रबिंदू हलवला. पहिल्यांदा मराठी साहित्यामध्ये महानगरातील व्यथा वेदना आणि गाव कुसाबाहेर अस्पृश्य, दलित व उपेक्षित समाजाचे, व्यक्तींचे दुःख, वेदना आपल्या साहित्यातून प्रकट केले. अण्णा भाऊ साठेंचा लेखनाचा मूळ धर्म हा सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तन हाच होता. समाजातील विषमता संपली पाहिजे, इथे प्रत्येक व्यक्तीला समानतेने जगता आले पाहिजे ,अण्णा भाऊंच्या साहित्याला जीवन जाणिवांचा स्पर्श असल्यामुळे ते साहित्य सर्वसामान्य वाचकांना आपले वाटते .जे विषय प्रस्थापित साहित्यिकांनी कधीही आपले म्हणून स्वीकारले नाहीत अशा महत्त्वाच्या विषयांना अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून न्याय दिला.
मुंबईसारख्या शहरात झोपडपट्टीत राहणारे गरीब लोक ,फुटपाथवर झोपणारे लोक, वेश्या व्यवसायात अडकवल्या गेलेल्या मुली, मुरळीप्रथा असेल, तमाशा कलावंत असतील, गिरणी कामगार असतील या सर्वांच्या व्यथा त्यांनी प्रखडपणे आपल्या कथा कादंबऱ्यातून मांडण्याचे काम केले. अण्णाभाऊंनी एकूण 35 कादंबऱ्यांचे लेखन केले त्यापैकी जवळपास 16 कादंबऱ्या ह्या स्त्रीप्रधान कादंबऱ्या आहेत. अण्णाभाऊंनी कथा ,कादंबऱ्या, लोकनाट्य , लावण्या,पोवाडे ,प्रवास वर्णन अशी जवळपास 84 पुस्तकांचे लेखन केले. त्यांच्या कादंबऱ्यातील आणि कथेतील नायिका ह्या आपले चारित्र्य व शील सांभाळण्यासाठी धाडसाने लढणाऱ्या आहेत.अण्णाभाऊ नेहमी असं म्हणायचे वडील किंवा पुरुष जर आकाश असेल तर आई किंवा स्त्री ही धरणी आहे आणि धरणीचे मोल मान्य केल्याशिवाय आकाशाला महत्त्व प्राप्त होणार नाही. स्त्रीचा सन्मान करायला हवा.
अण्णा भाऊ हे सामाजिक तळमळ असलेले साहित्यिक होते. त्यांनी कधीही स्वतःचे लेखकपण मिरवण्यासाठी, पुरस्कारासाठी लेखन केले नाही, तर माझा लेखणीतून व माझ्या शाहिरीतून समाजाचे दैन्य आणि दुःख कमी व्हावं , समाजातल्या विषमतेवर प्रखरपणे त्यांनी प्रहार केला. अवघे 49 वर्षांचे आयुष्य अण्णाभाऊंना मिळाले पण आपले सर्व आयुष्य समाज परिवर्तन आणि प्रबोधनासाठी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी त्यांनी खर्च केले .साहित्य, चित्रपट व राजकीय क्षेत्रातील बड्या व्यक्तींशी त्यांचा स्नेह होता पण त्यांनी कधीही त्या व्यक्तींकडे स्वतःसाठी पद किंवा आर्थिक मागणी कधीच केली नाही. चिरागनगरच्या झोपडीत आयुष्यभर आपल्या प्रतिभेचा चिराग सांभाळत राहिले.कंदीलाच्या उजेडात समाजातला अंधार दूर व्हावा म्हणून शब्दांची ज्योत प्रज्वलित ठेवत राहिले. अण्णा भाऊ साठे हे जागतिक दर्जाचे साहित्यिक होते पण त्या काळामध्ये समीक्षकांनी त्यांच्या साहित्याची दखल घेतलीच नाही. अण्णाभाऊंचे साहित्य मानवतेचा संदेश देणारे होते,असे वि.दा .पिंगळे यांनी आपल्या भाषणातून विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक प्रदीप उर्फ बाबासाहेब धुमाळ, पुणे महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या सौ.दिपालीताई धुमाळ व कर्वेनगर भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. के.डी पवार व इतरही मान्यवर उपस्थित होते. मा. प्रदीप धुमाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल घटवाई यांनी केले . सौ दिपालीताई धुमाळ यांनी वक्ते वि.दा. पिंगळे यांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार केला.याप्रसंगी वि.दा. पिंगळे यांनी लोकमान्य टिळक यांचा कर्तुत्वाचा देखील आढावा घेतला.