PMC Road Department | खड्डे बुजवण्यात असमर्थ ठरलेल्या पथ विभागाच्या माथी खोदलेले रस्ते दुरुस्तीचे काम | पथ विभाग दर्जेदार काम करेल का? विवेक वेलणकर यांचा सवाल
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका आयुक्तांनी राज्य शासनाच्या दबावापुढे मान तुकवून भर पावसाळ्यात रस्ते खोदाईला परवानगी देऊन आधीच झालेले खड्डे बुजवण्यात असमर्थ ठरलेल्या रस्ते विभागाच्या माथी खोदलेले रस्ते दुरुस्तीचे कामही मारले आहे. रस्ते विभागाचा पूर्वेतिहास बघता रस्ते दुरुस्ती दर्जेदार होईल यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. असा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. (Vivek Velankar Sajag Nagrik Manch)
याबाबत वेलणकर यांनी महापालिका आयुक्त यांना पत्र दिले आहे. त्यानुसार शहरातील सुमारे तीनशे किलोमीटर रस्ते खोदून तेथे सीसीटीव्ही केबल टाकण्याचे काम पुणे पोलिसांकडून एका कंत्राटदारामार्फत होत आहे. खरं तर पावसाळ्यात कुठलेही खोदकाम करण्यास महापालिका परवानगी देत नाही , कारण आधीच पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे असतात आणि अशा परिस्थितीत आणखी खोदकाम केलेले रस्ते दर्जेदार दुरुस्त करणे अशक्यच असते. याशिवाय यातले अनेक रस्ते कंत्राटदारांच्या defect liability period मधे आहेत , ज्यावर खोदकाम केले की कंत्राटदारांची defect liability मधून सुटकाच झाली. त्यामुळे या रस्त्यांवर कुठेही खड्डे पडले तर कंत्राटदार हात झटकून मोकळा होणार. पण राज्य शासनाच्या गृह विभागाच्या फतव्यापुढे महापालिकेने नांगी टाकली.
वेलणकर यांनी पुढे म्हटले आहे कि, खरे तर महापालिका रस्ते खोदाई करणाऱ्या कंत्राटदारांकडून ११००० रुपये प्रति रनिंग मीटर खोदाई शुल्क घेते , पण या कामाचे तेही पैसे महापालिकेला मिळणार नाहीत आणि रस्ता परत पूर्ववत करण्याचे कामही शासनाने नेमलेला कंत्राटदार करणार नाही. कारण राज्य शासनाने या कामाच्या एस्टीमेट मधे यासाठी तरतूदच केलेली नाही. त्यामुळे आता हे रस्ते दर्जेदार पद्धतीने दुरुस्त करण्याचे कामही महापालिकेलाच करावे लागणार आहे. यासाठी महापालिकेला तीनशे कोटी रुपये खर्च येणार आहे. एवढं करुनही कंत्राटदार महापालिकेच्या रस्ते विभागाने दिलेले आदेश ( जागेवर कामाचे फलक लावणे, ५० / ५० मिटरच्या टप्प्याने काम करून महापालिकेच्या रस्ते विभागाला रस्ता पूर्ववत करण्याची संधी देणे) दुर्लक्षित करुन मनमानी पद्धतीने काम करतो आहे.
कालपासून ओंकारेश्वर ते रमणबाग असा शनिवार पेठेतील जवळपास एक किमी रस्ता आणि फूटपाथ खणून ठेवला आहे आधीच अरुंद रस्ते, भिडे पूल वाहतुकीसाठी बंद आणि त्या भागातील तीन तीन शाळा यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीने नागरीकांचे जीवन असह्य झाले आहे. रस्ते विभागाचा पूर्वेतिहास बघता रस्ते दुरुस्ती दर्जेदार होईल यावर शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही. नागरीकांची अवस्था मात्र हाल इथले संपत नाहीत अशी झाली आहे. पुणे महापालिका आयुक्तांनी राज्य शासनाच्या दबावापुढे मान तुकवून भर पावसाळ्यात रस्ते खोदाईला परवानगी देऊन आधीच झालेले खड्डे बुजवण्यात असमर्थ ठरलेल्या रस्ते विभागाच्या माथी हे खोदलेले रस्ते दुरुस्तीचे कामही मारले आहे. असे वेलणकर यांनी म्हटले आहे.
——–
संपूर्ण शहरातील या कामासाठी लागणारे जवळपास तीनशे कोटी मिळण्याकरता राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करण्याचा महापालिकेचा इरादा आहे. आता ही जबाबदारी पुण्यातील दोन मंत्री आणि आमदार उचलतील का हा खरा प्रश्न आहे.
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे

COMMENTS