PMC Heritage Yatra 2025 | आजपासून “हेरिटेज यात्रा २०२५” सांस्कृतिक वारसा उत्सव | पुणे महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन
PMC Cultural Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिका व एम. आय. टी.ए. डी. टी. विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने २३ ते २६ एप्रिल २०२५ दरम्यान “हेरिटेज यात्रा २०२५” या सांस्कृतिक वारसा उत्सवाचे आयोजन केले आहे. अमृत महोत्सवी वर्ष व जागतिक वारसादिनाचे औचित्य साधून २३ ते २६ एप्रिल या सप्ताहामध्ये वारसा थीमवर आधारित ” हेरिटेज यात्रा २०२५” या कार्यक्रमाचे कलाग्राम, पु.ल. देशपांडे उद्यान सिंहगड रोड येथे आयोजन केले आहे. मा.महानगरपालिका आयुक्त, डॉ राजेन्द्र ब भोसले यांचे शुभहस्ते २३/०४/२०२५ रोजी सायं. ५.०० वाजता या कार्यक्रमाचे उदघाट्न होणार आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड सदर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
” हेरिटेज यात्रा २०२५” या कार्यक्रमांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये ‘रंगवेद’ या संस्थेमार्फत दि.२३/०४/२०२५ रोजी उदघाट्नानंतर मातृभूमीसाठी संघर्ष केलेल्या भारतातील अज्ञात महिला योद्ध्यांवर प्रकाश टाकणारा ‘अज्ञात शलाका’ हा सांस्कृतिक कार्यक्रम मुंबईतील ‘रंगवेद’ ही संस्था सादर करणार आहे.
तसेच दि. २३ ते २६ एप्रिल दरम्यान शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वारसा थीमवर आधारित निबंध स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये नाट्य कार्यशाळा, संगीत नाट्यशाळा, मधुबनी, चित्रकला, बांबू विणकाम इत्यादी कार्यशाळा असणार आहेत. तसेच तरुण पिढीसाठी ‘भूतकाळातील चौकटी’ – जुन्या पुण्याचे दरवाजे आणि खिडक्या या विषयावर छायाचित्रण स्पर्धा आयोजित केलेली आहे . तसेच १८ एप्रिल २०२५ रोजी जागतिक वारसादिनाच्या निमित्ताने शनिवारवाडा ते विश्रामबागवाडा या हेरिटेज वॉकचे आयोजन केले होते. दि. २४ एप्रिल रोजी सुद्धा सकाळी ७.०० ते १०.०० या वेळेत हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आलेले आहे.
पुणे शहराचा झपाटयाने विस्तार होत असून पुणे शहराच्या वाढीचा वेग व बदलणारे स्वरूप पाहता या शहराचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्वही जपणे आवश्यक झालेले आहे. पुणे शहराचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, जडणघडण व जुन्या पुण्याची ओळख शहरात येणारे पर्यटक व भावी पिढी यांना होण्यासाठी व जनजागृतीसाठी ‘हेरिटेज यात्रा २५’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमामध्ये विविध कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वास्तू व वारसा जपण्याचे महत्व कळण्यास मदत होणार आहे. एकंदरीत पुण्यास मोठ्या प्रमाणावर लाभलेल्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारसाचे दर्शन या कार्यक्रमाच्या अनुषंगाने होणार आहे. सदर संपूर्ण कार्यक्रम पु. ल. देशपांडे कलाग्राम येथे आयोजित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम विनामूल्य आहे. कलाग्राम ही वास्तू महानगरपालिकेने विकसित केली असून प्रत्येक पुणेकरासाठी ती अभिमानास्पद आहे तरी या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी अवश्य भेट द्यावी. असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
COMMENTS