PMC Health Department | हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचे लसीकरण | सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा लसीकरण अधिकारी डॉ. राजेश दिघे
Dr Rajesh Dighe PMC – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे २६ April रोजी हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचे लसीकरण करण्याची मोहिम पार पाडण्यात येणार आहे. मोहिम युनानी हॉस्पिटल,आझाम कॅम्पस, गोळीबार मैदान जवळ, कॅम्प, पुणे या ठिकाणी सकाळी ९ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आलेली आहे. असे पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा लसीकरण अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी सांगितले. (PMC Vaccination)
या संदर्भात हज यात्रेला जाणाऱ्या पात्र यात्रेकरूंची यादी पुणे महानगरपालिकेस मे. राज्य शासनाकडून प्राप्त झाली आहे. यात सुमारे १,५०३ यात्रेकरूंची नावे आहेत. सर्व संबधित यात्रेकरूंची आरोग्य तपासणी पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय या ठिकाणी करण्यात आली आहे. या करिता हज कमिटी अध्यक्ष श्री सय्यद रियाझ इस्माईल (काझी) अध्यक्ष, खुद्दाम ई हुज्जाज कमिटी व श्री मोहम्मद सय्यद खान (सचिव) आणि सदस्य व कमला नेहरू रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत बोठे व त्यांच्या तज्ञ डॉक्टरांच्या पथकाचे सहकार्य लाभले .
शनिवार, रोजी होणाऱ्या सत्रासाठी ८ डॉक्टर, २३ परिचारिका, १० डेटा एन्ट्री ऑपरेटर, १० अटेंडंट यांना नेमण्यात आले असून याकरिता आवश्यक ते प्रशिक्षण पूर्ण करून घेण्यात आले आहे.
नारायण पेठ लसीकरण केंद्राकडील श्री. संदेश देशपांडे, शुभांगी वाघापुरे, नेहा मुरकुटे, अनुराधा हगवणे व यांच्या अधिनस्थ कर्मचारी यांचेमार्फत लसीचा पुरवठा करणे,प्रमाणपत्र वाटप करणे तसेच यात्रेकरूंना आवश्यक ते सहकार्य करणे, इत्यादी कामे पार पाडली जाणार आहेत .
सदर शिबिरात यादीतील नाव असणाऱ्या सर्व यात्रेकरूंना (अपवाद – गरोदर महिला) पोलिओ लस तोंडावाटे व मेनिन्जायटीस लस इंजेक्शनव्दारे टोचण्यात येणार आहे. वय वर्ष ६५ वरील व्याधीग्रस्त व्यक्तींना शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार इन्फ़्लुएन्ज़ा लसीचा डोस देण्यात येणार आहे. असे पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा लसीकरण अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी, डॉ नीना बोराडे यांनी लसीकरणासाठी येणाऱ्या सर्व यात्रेकरूना जेवण करून मगच लसीकरण करून घेण्याचे तसेच सोबत पासपोर्टची झेरोक्स, वैद्यकीय प्रमाणपत्राची झेरोक्स सोबत घेवून नेमून दिलेल्या वेळेत (टाइम स्लॉटमध्ये) लसीकरण केंद्रावर येण्याचे आवाहन केले आहे .
COMMENTS