PMC Election Website | पुणे मनपा निवडणूक संकेतस्थळाला अभूतपूर्व प्रतिसाद | एका दिवसात एक लाख नवीन भेटी!
PMC IT Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर माहिती व तंत्रज्ञान विभागा मार्फत नागरिक, मतदार व उमेदवारांच्या सोयीसाठी स्वतंत्र आणि सुस्पष्ट निवडणूक संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून pmc.gov.in या संकेतस्थळाला अल्प कालावधीतच अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
या संकेतस्थळावर निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व आवश्यक माहिती वेळेत, पारदर्शकपणे आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये नामनिर्देशन प्रक्रिया व त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, निवडणूक कार्यक्रम, निवडणूक निर्णय अधिकारी यांची माहिती, उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र, मतदार यादी तसेच प्रभाग रचना आराखडा यांचा समावेश आहे. त्यामुळे मतदार आणि उमेदवारांना आपल्या प्रभागाशी संबंधित माहिती सहजपणे पाहता येत आहे.
pmc.gov.in या संकेतस्थळावर मताधिकार अँप, ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) साठी स्वतंत्र प्रणाली, प्रचार परवानग्यांसाठी एक खिडकी कक्ष, तसेच मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे पोर्टल अशा उपयुक्त डिजिटल लिंक्स एकत्रितपणे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे अधिक सुलभ झाले आहे.
सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठीच्या pmc.gov.in या स्वतंत्र संकेतस्थळाला आतापर्यंत ४ लाखांहून अधिक भेटी प्राप्त झाल्या असून, केवळ एका दिवसात सुमारे एक लाख नवीन भेटी नोंदविण्यात आल्या आहेत. हे आकडे संकेतस्थळावरील पारदर्शकता, विश्वासार्हता आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग अधोरेखित करतात. तसेच उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र प्रसिद्ध करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या नव्या डिजिटल प्रणालीद्वारे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयांमार्फत उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. प्रतिज्ञापत्र प्रसिद्ध झाल्यानंतर काहीच दिवसांत संकेतस्थळाला ५४,००० हून अधिक प्रतिज्ञापत्र डाउनलोड झाले असून नागरिकांचा माहितीप्रती असलेला वाढता उत्साह यावरून स्पष्ट दिसून येतो.
निवडणूक प्रक्रियेमध्ये डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा पुणे महानगरपालिकेचा हा उपक्रम मतदार जागृती आणि निवडणूक पारदर्शकतेसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. pmc.gov.in हे संकेतस्थळ मा. महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त (निवडणूक विभाग) प्रसाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आले असून नागरिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे असे माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख राहुल जगताप यांनी सांगितले.

COMMENTS