PMC Contract Employees | कंत्राटी कामगारांच्या बोनससाठी वेतन मर्यादा 35 हजार करण्यासाठी महापालिका प्रशासनाचा सकारात्मक अभिप्राय
| शासनाला कळवणार; अभिप्राय स्थायी समितीसमोर सादर
PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांना बोनस मिळावा यासाठी बोनस प्रदान अधिनियम 1965 नुसार असलेली वेतन मर्यादा प्रतिमाह 21,000 रुपयांवरून 35,000 रुपये करण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्याच्या प्रस्ताववर महापालिका प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिला आहे. हा अभिप्राय स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला आहे. (Pune PMC News)
पेमेंट ऑफ बोनस अॅक्ट अमेंडमेंट अॅक्ट 2015 नुसार बोनसाठी असलेली वेतन मर्यादा 10,000 रुपयांवरून 21,000 रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या पुणे महापालिकेचे जे अकुशल कंत्राटी कामगार आहेत आणि ज्यांचे मासिक वेतन 21,000 रुपयांपेक्षा कमी आहे, अशा सर्व कंत्राटी कामगारांना दरमहा वेतनातून बोनस दिला जात आहे.
मात्र ज्या कंत्राटी कामगारांचे वेतन 21,000 रुपयांपेक्षा जास्त आहे अशा कुशल व अर्धकुशल कंत्राटी कामगारांना पेमेंट ऑफ बोनस अॅक्ट 1965 मधील तरतुदीनुसार बोनस देय होत नाही.
स्थायी समितीत बोनसाठीची वेतन मर्यादा 35,000 रुपये इतकी वाढवून शासनाकडे मागणी करण्यासंदर्भातील विषय आला होता. त्यावर महापालिका आयुक्तांचा अभिप्राय मागवण्यात आला होता.
प्रशासनाने दिलेल्या अभिप्रायात म्हटले आहे की, ठरावाने मागणी केल्यानुसार पेमेंट ऑफ बोनस अॅक्ट 1965 नुसार लागू असलेली प्रचलित वेतन मर्यादा वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनास विनंती पत्राद्वारे कळविण्यास प्रशासनाची अडचण नाही.
त्यामुळे स्थायी समितीच्या ठरावानुसार शासनाकडे वेतन मर्यादा वाढवून देण्याची मागणी करावी, असा अभिप्राय प्रशासनाने दिला आहे.
वेतन मर्यादा 35,000 रुपये झाल्यास कुशल आणि अर्धकुशल कंत्राटी कामगारांनाही बोनसचा लाभ मिळू शकेल. सध्या केवळ 21,000 रुपयांपेक्षा कमी वेतन घेणाऱ्या अकुशल कामगारांनाच बोनस मिळत आहे.
हा प्रस्ताव आता स्थायी समितीच्या मंजुरीनंतर अंतिम निर्णयासाठी मुख्य सभेत जाणार आहे.

COMMENTS