PMC Contract Employees Bonus | मनपा कंत्राटी कामगारांचे विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण आंदोलन | अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. बोनस संदर्भात 22 ऑक्टोबर रोजी घेणार बैठक
Sunil Shinde RMS – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या कायम कामगारांना पगाराच्या 8.33% बोनस व रुपये 23000 एवढी रक्कम सानुगृह अनुदान म्हणून दिवाळीपूर्वी देण्याचे जाहीर करण्यात आले. परंतु याच वेळी मनपा मध्ये काम करणारे सुमारे साडेदहा हजार कंत्राटी कामगारांना मात्र कोणतीही रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. सर्वांचा निषेध म्हणून या सर्व प्रश्नाकडे व कंत्राटी कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज राष्ट्रीय मजदूर संघाच्या महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रतिनिधींनी कामगार नेते सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या गेटवर सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण आंदोलन केले. यावेळी बहुसंख्येने वेगवेगळ्या विभागातील कंत्राटी कामगार प्रतिनिधी हे उपस्थित होते. (Pune PMC News)
वास्तविक पाहता मागील वर्षी कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण आंदोलन महापालिकेच्या गेटवर करण्यात आले होते. यावेळी महापालिका प्रशासनाने महापालिकेतील सर्व कंत्राटदारांना कंत्राटी कामगारांना बोनस द्यावा असे पत्र दिलेले होते व त्याचप्रमाणे कामगार उपायुक्त पुणे यांनीही पुणे मनपाच्या आयुक्तांना कंत्राटी कामगारांना बोनस कायदा लागू होतो त्याप्रमाणे त्यांना बोनस द्यावा असे आदेश दिले होते. परंतु अद्याप पर्यंत त्यावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही आणि या वर्षीही बोनस देण्याबाबत कोणती हालचाल प्रशासनाकडून दिसून येत नाही.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले प्रशासन कंत्राटी कामगार प्रश्नाकडे मुद्दाम डोळेझाक करत आहे. कायद्याने देणं असतानाही कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत प्रशासन उदासीन दिसत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून कामगार कायद्याचे उल्लंघन होत आहे. कंत्राटी कामगार हा प्रत्येक वेळी अनेक अडचणींमध्ये महापालिकेची व पुणेकरांची सेवा करण्याचे काम करत आलेला आहे. परंतु त्याला प्रशासन मुद्दाम डावलण्याचे काम करत आहे. या पाठीमागे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांचे लागेबंध असल्याचा गंभीर आरोप श्री शिंदे यांनी यावेळी केला. या आंदोलनाची दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी बोनस संदर्भात 22 ऑक्टोबर रोजी बैठक घेऊन बोनस विषयी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच बोनस संदर्भात कामगार उपायुक्त कार्यालयातील सहाय्यक कामगार आयुक्त निखिल वाळके यांच्या समोर 10 ऑक्टोबर रोजी मनपा अधिकारी व संघटना पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आहे. अशी माहिती कामगार नेते सुनील शिंदे यांनी दिली.
याप्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, सरचिटणीस एस. के. पळसे, संघटक विशाल बागुल, कामगार प्रतिनिधी जान्हवी दिघे, विजय पांडव, उज्वल साने, अरविंद आगम, गुरुनाथ बिराजदार, प्रकाश इंदुरीकर, स्वप्नील कामठे, रमेश भोसले, सचिन घोरपडे, सरिता धुळेकर, दिपाली कांबळे, गोरखनाथ कांबळे, विनायक देहगावकर उपस्थित होते.
COMMENTS