PMC Accident Insurance | समूह अपघात विमा योजना | महापालिका आयुक्तांनी दुजाभाव केल्याने कर्मचारी नाराज!
PMC Accident Insurance | (Author – Ganesh Mule) पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना (PMC Group Accident Insurance Scheme) चालवली जाते. कर्मचाऱ्याकडून 136 रुपये घेऊन 10 लाखाचा विमा उतरवला जायचा. मात्र यंदा रक्कम वाढवली आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी यात दुजाभाव केला असल्याची कर्मचाऱ्यांची भावना आहे. कारण वर्ग-१ साठी २५ लाख, वर्ग-२ साठी २० लाख, वर्ग-३ व ४ साठी १५ लाख इतका विमा असेल. 3-4 वर्गातील कर्मचाऱ्यांनाच याची खरी गरज असते. असे असतानाही त्यांनाच कमी रक्कम ठेवली आहे. योजना ही कर्मचाऱ्यांसाठी आहे कि विमा कंपनीच्या लाभासाठी असाही प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी नाराजी दर्शवत यात समानता आणण्याची मागणी केली आहे. (PMC Accident Insurance)
– सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी लागू योजना
महापालिकेच्या (PMC Pune) विविध विभागात अनेक कर्मचारी (PMC Pune Employees) काम करतात. जवळपास 20 हजार कर्मचारी आहेत. शहराच्या सर्व विकासकामांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. यामध्ये अ गटातील अधिकाऱ्यांसह ड गटातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेकडून विविध योजना (PMC Services) दिल्या जातात. आतापर्यंत पालिकेकडून कामगारांना अपघात विमा दिला जात नव्हता. परंतु 2016-17 पासून महापालिकेच्या अधिकारी व कामगारांना विमा संरक्षण मिळत आहे. कारण जेव्हा एखादा कामगार अपघाताला बळी पडतो तेव्हा त्याचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होते. अनेकांना आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागतात, काहींना डोळे गमवावे लागतात. यामुळे हे लोक काम करण्यास सक्षम राहत नाहीत. अशा कामगारांना पालिका विम्याच्या माध्यमातून आधार देत आहे. अशा प्रकारची योजना राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. याअंतर्गत पालिका कर्मचाऱ्यांना 10 लाखांचा विमा मिळत आहे. जे कायमचे अपंग असतील, त्यांना या योजनेचा 100 टक्के लाभ दिला जातो. कारण अपंगत्वाच्या प्रकारानुसार त्याचा लाभ कामगारांना मिळ आहे. पालिकेत काम करणाऱ्या अ गटातील अधिकाऱ्यांपासून ते ड गटातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. यासाठी या कामगारांना त्यांच्या पगारातून दरमहा केवळ १३६ रुपये द्यावे लागतात. महापालिका प्रशासनाने २०१६-१७ या वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे 19 कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांना महापालिकेने 1 कोटी 74 लाख रुपये दिले आहेत. (PMC Accident Insurance News)
आयुक्तांचा आदेश काय आहे?
दरम्यान यंदा मात्र या योजनेला मान्यता देताना उशीर झाला आहे. तसेच मान्यता देतानाही यात वर्गवारी करण्यात आली आहे. यामुळे कर्मचारी मात्र नाराज झाले आहेत. महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार वैयक्तिक अपघात योजना गट-अ ते ड मधील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना लागू असेल. वैयक्तिक अपघात योजनेचा राशीभूत विमा (Capital Sum Assured) रक्कम १) वर्ग-१ साठी रु.२५ लाख, २) वर्ग-२ साठी रु. २० लाख, ३) वर्ग-३ व ४ साठी रु. १५ लाख इतका असेल. अपघातामध्ये आलेला मृत्यु, कायमचे अपंगत्व / विकलांगता किंवा दोन हात, दोन पाय किंवा दोन्ही डोळे गमावून अपंगत्व / विकलांगता आल्यास त्यास १००% लाभ अनुज्ञेय असेल. कायमचे अंशत: अपंगत्व / विकलांगता आल्यास अंपगत्वाच्या स्वरूपानुसार लाभाची टक्केवारी विहीत करण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation News)
त्यासाठी पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे माहे जुलै २०२३- पेड इन ऑगस्ट २०२३ चे वेतनातून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी समुह अपघात वार्षिक सभासद वर्गणी १) वर्ग-१ साठी प्रत्येकी ४७२ २) वर्ग-२ साठी प्रत्येकी ३७१.१०, ३) वर्ग-३ व ४ साठी प्रत्येकी २६५.५०/- कपात करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेतील आस्थापनेवरील अधिकारी/कर्मचारी यांचे माहे जुलै २०१३ — पेड इन ऑगस्ट २०२३ वेतनातून वर्गणी कपात न केल्यास वा कमी वर्गणी कपात केल्यामुळे संबंधित व्यक्ति लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित वेतनपत्रक लेखनिक व आहरण व संवितरण अधिकारी (पगारपत्रकावर स्वाक्षरी करणारे) यांची राहील, याची नोंद घ्यावी. असे आदेशात म्हटले आहे. समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वर्गणी कपात न करणे, कमी कपात करणे, प्रलंबित वर्गणी अन्य/अंतिम देय रकमेतून कपात करणे या व अशा सर्व बाबीस वेतनपत्रक लेखनिकास जबाबदार धरून त्यांचेविरुध्द शास्तीची कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. असेही आयुक्तांनी म्हटले आहे.
यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये दुजाभाव निर्माण केल्याची भावना निर्माण झाली आहे. कारण याची खरी गरज वर्ग 3 व 4 मधील कर्मचाऱ्यांना आहे. त्यांनाच विम्याची कमी रक्कम मिळणार आहे. योजना ही कर्मचाऱ्यांसाठी आहे कि विमा कंपनीच्या लाभासाठी असाही प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे यात समानता आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
—-
आगामी वर्षात यात समानता आणली जाईल. शिवाय चालू वर्षी जर मागणी आली तर कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार वर्ग 3 व 4 साठी वेगळी विमा योजना राबवली जाईल.
– अरुण खिलारी, मुख्य कामगार अधिकारी, पुणे मनपा
—-
News Title | PMC Accident Insurance | Group Accident Insurance Plan | The municipal commissioner is angry with the employees!