PM Awas Yojana | PMC Pune | पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेकडून वडगाव, हडपसर आणि खराडी येथे उभारल्या 2650 सदनिका   | पंतप्रधान यांच्या हस्ते देण्यात येणार घराच्या चाव्या 

HomeBreaking Newsपुणे

PM Awas Yojana | PMC Pune | पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेकडून वडगाव, हडपसर आणि खराडी येथे उभारल्या 2650 सदनिका  | पंतप्रधान यांच्या हस्ते देण्यात येणार घराच्या चाव्या 

Ganesh Kumar Mule Jul 28, 2023 3:40 PM

Pune | Animal Hospital | हडपसर ला होणार प्राण्यांचे हॉस्पिटल!  | भटक्या कुत्र्यांचाही केला जाणार बंदोबस्त 
Hadapsar Traffic Congestion | लवकरच होणार हडपसर परिसराचा कायापालट.! | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचा पुढाकार 
Manjri Flyover | मांजरी येथील नवीन रेल्वे उड्डाणपुल वाहतुकीसाठी लवकर खुला करा | सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

PM Awas Yojana | PMC Pune | पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेकडून वडगाव, हडपसर आणि खराडी येथे उभारल्या 2650 सदनिका

| पंतप्रधान यांच्या हस्ते देण्यात येणार घराच्या चाव्या

PM Awas Yojana | PMC Pune |केंद्रसरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे, प्रधानमंत्री आवास योजना (Pradhanmantri Awas Yojana). ही योजना केंद्र सरकार, राज्य शासन व पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corportion) यांनी समन्वयाने राबवली असून या योजनेच्या अंतर्गत वडगाव (खुर्द) व खराडी या ठिकाणी प्रत्येकी एक तर हडपसर येथे ३ गृहप्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना आपल्या हक्काचे घर केंद्र शासन, राज्य शासन व पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) वतीने उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेकडून वडगाव, हडपसर आणि खराडी येथे 2650 सदनिका उभारल्या आहेत. यातील काही लोकांना पंतप्रधान यांच्या हस्ते  घराच्या चाव्या देण्यात येणार आहेत.. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PM Awas Yojana | PMC Pune)

प्रत्येक नागरिकाकडे स्वत:चे हक्काचे घर असावे यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेची घोषणा केली होती. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ दोन महत्वाच्या पात्रता केंद्र सरकारने ठरवून दिल्या आहेत. यामध्ये लाभार्थ्याच्या कुटुंबाच्या नावे भारतात कोठेही घर नसावे व त्याचे उत्पन्न हे तीन लाख रुपयांच्या आत असावे. यामुळे हातावर पोट असणारे, कमी उत्पन्न असणारे व्यक्तींकरिता आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाउल ठरले आहे. (Pune Municipal Corporation News)

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पुणे महापालिका हद्दीत तीन ठिकाणी गृहप्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी नियोजित जागा उपलब्ध होण्यासाठी पालिकेच्या वतीने ईडब्ल्यूएस (EWS), एचडीएच (HDH) आरक्षण असलेल्या जागामालकांशी संवाद साधला. यानुसार जागा मालकांना टीडीआर व एफएसआय देवून जागा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. हे सर्व प्रकल्प मुख्य रस्त्याच्या आसपास, नांदेड सिटी, खराडी आयटी पार्क सारख्या परिसराच्या जवळपास असल्याने लाभार्थ्यांना उपजीविकेच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत.

या पाच गृहप्रकल्पांपैकी सर्व्हे नंबर १०६ अ व १७ अ, सर्व्हे नंबर ८९ (पै)+ ९२ (पै) व सर्व्हे नंबर १०६ अ १२ या हडपसर मधील तीन ठिकाणी प्रकल्प उभारण्यात आले आहेत. तसेच सर्व्हे नंबर ५७-५ पार्ट प्लॉट नंबर १, खराडी व सर्व्हे नंबर ३९ (पै) + ४० (पै) वडगाव खुर्द या ठिकाणी प्रत्येकी एका गृह प्रकल्पाची बांधणी करण्यात आली आहे. हडपसर येथील तीन प्रकल्पात मिळून ७६४, वडगाव खुर्द येथे ११०८ तर खराडी येथे ७८६ सदनिकांची निर्मिती करून सज्ज करण्यात आली आहेत. (PMC Pune News)

या गृहप्रकल्पातील सदनिकांचे क्षेत्रफळ सुमारे ३०० चौरस फुट ते ३३० चौरस फुट असून सदनिकेमध्ये हॉल, किचन, बेडरूम, स्वतंत्र स्वच्छतागृह व बाथरूम व बाल्कनीची सोय करण्यात आली आहे. सुमारे १० ते सव्वा १२ लाख रुपयामध्ये या सदनिका लाभार्थ्याना उपलब्ध झाल्या आहेत. यातील सुमारे साडे आठ ते साडे नऊ लाखांची रक्कम लाभार्थी भरणार आहेत. या लाभार्थ्याला साहाय्य म्हणून राज्य शासन १ लाख तर केंद्र शासन दीड लाखांचा निधी दिला आहे. या गृहप्रकल्पासाठी २४ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिली तर राहिलेल्या लाभार्थ्यांसाठी ३० मार्च २०२२ रोजी दुसरी लॉटरी काढण्यात आली होती.

कोरोना काळानंतरच्या कालावधीनंतर पुणे महानगरपालिकेने या प्रकल्पांचा गतीने विकास व्हावा, यासाठी भरीव निधीची तरतूद केली होती होती.  यामध्ये २०२१-२२ साली ६२ कोटी, २०२२-२३ साली १२० कोटी तर २०२३-२४ साली ९५ कोटी रुपयांची तरतूद पुणे महानगरपालिकेने केली होती.

या प्रकल्पासाठी पात्र ठरणारे लाभार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने यातील अनेकांना कर्ज मिळण्यास देखील मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. कोरोनामुळे गेलेली नोकरी, बंद असणारे व्यवसाय, खराब झालेले सिबिल यामुळे अनेक लाभार्थी हतबल झाले होते. यावेळी पुणे महानगरपालिकेकडून मा. शहर अभियंता यांनी पुढाकार घेताना राष्ट्रीयकृत बँक व एनबीएफसी यांना व लाभार्थ्यांना ‘कर्ज मेळाव्यांचे’ व्यासपीठ दोन वेळा उपलब्ध करून दिले. सदर प्रकरणी मा.महापालिका आयुक्त व मा. अति. महापालिका आयुक्त यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले यामुळे राष्ट्रीयकृत बँक व एनबीएफसी यांनी या लाभार्थ्यांना कमी कागदपत्रे, कमी व्याजदर असलेले कर्ज लवकरात लवकर उपलब्ध करून देताना त्याचे वितरण देखील करण्यात आले. रेरा मुदतीच्या सुमारे प्रकल्पाचे सहा महिने आधीच प्रकल्प पूर्ण झाल्याने या लाभार्थ्यांची हफ्ते व घरभाडे यांच्या दुहेरी कात्रीतून सुटकाझालेली आहे.

या गृहप्रकल्पामध्ये भूकंप अवरोधक सांगाडा, विटा व प्लास्टर यांचा वापर करून केलेले मजबूत बांधकाम, प्रत्येक घराच्या किचनमध्ये कडप्पा व स्टेनलेस स्टीलचे सिंक व इलेक्ट्रिक साहित्य वापरण्यासाठी मुबलक पॉईंट, सर्व इमारतीमध्ये कॉपर वायरचे विस्तृत जाळे, तसेच मोड्युलर स्विचेस, इमारतीला संपूर्ण सिमेंट पेंट तर अंतर्गत भागासाठी  ऑईल पेंट ज्यामुळे घर आणखीनच आकर्षक झाली आहेत. तसेच स्वतंत्र स्वच्छतागृह व बाथरूमसाठी कन्सील्ड प्लंबिंग, तसेच गिझर पॉईंट उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक घरामध्ये ६०० बाय ६००चे व्हेंट्रीफाईड फ्लोरिंग, ऍल्युमिनियम पावडर कोटेड खिडक्या व दरवाजे अशा सर्व सुविधांनी ही घरे लाभार्थ्याना मिळणार आहेत. गृहप्रकल्पाचे भव्य गेट, सोलार, दुचाकीसाठी मुबलक पार्किंग, मोठे अंतर्गत रस्ते, बॅक अप सह लिफ्ट, एसटीपी प्लांट, वरिष्ठ नागरिकांसाठी वेगळी जागा, फायर फायटिंग सिस्टीम, गार्डन, रेनवॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा, जनरेटर या सुविधांमुळे हा प्रकल्प देखील व्यावसायिक प्रकाल्पांसारखे दिसत आहेत.

प्रकल्पाचे डिझाईन हे आयआयटी मुंबई / व्हीजेआयटी या नामांकित संस्थेकडून प्रमाणित करण्यात आले आहे. त्यांनी प्रमाणित केलेल्या व सुचविलेल्या सुचनानुसारच या प्रकाल्पाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हा प्रकल्प पुणे महानगरपालिकेसाठी महत्वपूर्ण असल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नानाविध यंत्रणा अमलात आणल्या होत्या. यामध्ये असणारी ‘थ्री टियर सिस्टीम’. ठेकेदाराच्या क्वालिटी लॅबच्या (lab) माध्यमातून कामाचे टेस्टिंग केले जात होते. कामासाठी आलेल्या साहित्यापैकी सुमारे १० टक्के साहित्याची ‘अनपेक्षित तपासणी’ (randam test) एनएबीएल अक्रीडेटेड लॅब (lab)च्या माध्यमातून तपासणी करण्यात येत होती. तज्ज्ञ प्रकल्प सल्लागार देखील झालेल्या कामाची गुणवत्ता तपासणी सातत्याने करत होते. त्यानंतर महानगरपालिकेचे अभियंते, अधिकारी देखील कामाची पडताळणी करत असल्याने गृहप्रकल्पाचे पूर्ण काम दर्जेदार झाले आहे.

या पूर्ण ग्रहप्रकल्पाची निर्मिती करणाऱ्या घटकांमध्ये कामगार हा महत्वपूर्ण घटक आहे. यामुळे पुणे महानगरपालिकेच्या वतीने कामगारांना सर्व प्रकारच्या सुरक्षा सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. ही सर्व उपकरणे वापरणे कामगारांना बंधनकारक असल्याने या प्रकल्पाच्या ठिकाणी कोणताही अपघात घडला नाही. याबरोबरीने कामगारांच्या आरोग्य देखील चांगले राहावे यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने दर महिन्यामध्ये तपासणी शिबिराचे देखील आयोजन करण्यात येत होते. कोरोना कालावधीमध्ये या सर्व कामगारांना धान्य, औषधे, जीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व या कामगारांना पुरविण्यात आल्या होत्या. पालिकेच्या वतीने अशा प्रकारे कामगारांच्या आरोग्याची व जीविताची सुरक्षा केल्याने क्रेडाईच्या वतीने वडगाव येथील प्रकल्पाला पुरस्कार देखील मिळाला.

केंद्र सरकारचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाला असून याचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. सन २०१७-१८ साली या कामाची निविदा पीडब्ल्यूडीच्या दर पत्रकानुसार प्रसिद्ध करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात विशेषत: कोरोना नंतरच्या काळात बांधकाम साहित्याच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ झाली होती. मात्र, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराकडून त्याच किमतीमध्ये, उत्तम दर्जाचे काम करून घेतले आहे. लाभार्थ्यांनी आपल्या सदनिका पाहिल्यानंतर पालिकेच्या वतीने करण्यात आलेया दर्जेदार कामावर समाधान व्यक्त केले.

सर्व प्रकल्पांस आवश्यक त्या परवानग्या पुणे महानगरपालिकेकडून घेण्यात आलेल्या आहेत.

या प्रकल्पातील लाभार्थ्यांची मानवी हस्तक्षेपाशिवाय निवड करणेसाठी ऑनलाईन सोडत यंत्रणेची (सॉफ्टवेअर) निर्मिती पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली होती. इच्छुक लाभार्थ्यांचे लॉटरीमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच सर्व कागदपत्रे मागविण्यात आली, ती तपासण्यात आली व एकदा माहिती पूर्ण झाली, कि याची पोच लाभार्थ्यांना एसएमएसद्वारे मिळत असे. यानंतर पुढील सर्व सुचना / अपडेट्स देखील याच ‘सिस्टीम’द्वारे येत असल्याने या यंत्रणेचा लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला.


पंतप्रधान आवास योजने अंतर्गत वडगाव, हडपसर आणि खराडी येथे 2650 सदनिका उभारण्यात आल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे अल्पदरातील हक्काचे घर उपलब्ध करून घ्यायचे माननीय पंतप्रधानांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारताना आनंद होत आहे. यापुढील काळात बाणेर , हडपसर परिसरातही या योजने अंतर्गत प्रकल्प उभारण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना सारख्या संसर्ग रोगाच्या साथीतही महारेरा च्या मुदती अगोदर सहा महिने प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. लवकरच सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून लाभार्थी नागरिक त्यांच्या स्वप्नातील घरात राहायला जातील यासाठी प्रयत्न केले जातील.

विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

————-\

News Title |PM Awas Yojana | PMC Pune | 2650 flats constructed at Vadgaon, Hadapsar and Kharadi by Pune Municipal Corporation under Pradhan Mantri Awas Yojana