पिंपरीच्या भाजपच्या नगरसेविका चंदाताई लोखंडे यांचा भाजपला रामराम; राष्ट्रवादीत प्रवेशाचे संकेत
: भाजप नेते आणि प्रभागातील सहकारी नगरसेवकांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा – चंदाताई लोखंडे
पिंपरी : भाजपचे नेते, प्रभागातील स्थानिक नगरसेवकांनी पाच वर्षात प्रचंड त्रास दिला. कोणतीही कामे होऊ दिली नाहीत. या त्रासाला कंटाळून भाजप नगरसेविका चंदाताई लोखंडे यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. लवकरच आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे चंदाताई लोखंडे यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या नगरसेविका चंदाताई लोखंडे यांनी आपला राजीनामा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक राजू लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण पवार, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक मयूर कलाटे, नगरसेवक राजू बनसोडे, सुलक्षणा शिलवंत – धर उपस्थित होते.
चंदाताई लोखंडे यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले, की मी पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक 29 चे महापालिकेत प्रतिनिधीत्व करीत होते. पिंपळे गुरव, वैदुवस्ती भागातून मी निवडून आले होते. निवडून आल्यानंतर प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविताना अनंत अडचणी आणल्या. चार सदस्यांचा प्रभाग असलेल्या या प्रभागात प्रथमपासूनच आपणास न विचारता भाजप नेते निर्णय घेत होते. प्रभागातील अन्य नगरसेवक व भाजप नेत्यांकडून जाणूनबुजून त्रास देण्यात आला. नागरिकांच्या समस्या सोडवताना सतत आडकाठी आणली. प्रभागातील विकासकामे करताना हेतुपुरस्सर त्रास दिल्याने विकासकामे पूर्णत्वास जाऊ शकली नाहीत.
विविध अडचणी आमच्यासमोर उभ्या केल्या. त्रास असाह्य झाला होता. या त्रासाला कंटाळून आज भाजप नगरसेविकापदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच आपली पुढची भूमिका स्पष्ट केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी भाजपला सुरुंग लावला असून, एकापाठोपाठ एक भाजप पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांचे निष्ठावंत अरुण पवार, माजी नगरसेवक राजू लोखंडे, मनसेचे शहर पातळीवरील नेते प्रदीप गायकवाड, आदिवासी समाजाचे नेते प्रा. विष्णू शेळके, बंजारा समाजाचे नेते संदीप राठोड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश राजेंद्र जगताप यांनी घडवून आणला आहे. आणि आता भाजपच्या विद्यमान नगरसेविका चंदाताई लोखंडे यांच्या भाजप नगरसेविकापदाचा राजीनामा देण्यामागे राजेंद्र जगताप यांचे राजकीय डावपेच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काही दिवसात चंदाताई लोखंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशनिश्चित मानला जात आहे.
COMMENTS