दौंड, पुरंदर तालुक्यांतील रेल्वेशी संबंधीत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी
| खा. सुप्रिया सुळे यांची विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसोबत बैठकीत मागणी
पुणे – बारामती लोकसभा मतदारसंघातील रेल्वे खात्याशी संबंधित विविध समस्यांबाबत मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांची भेट घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज चर्चा केली. दौंड रेल्वे स्थानकाचा रेल्वेच्या पुणे विभागीय कार्यक्षेत्रात समावेश करणे आणि अन्य मुद्द्यांचा यात समावेश आहे.
दौंड रेल्वेस्थानक हे सोलापूर पेक्षा पुणे शहराशी जवळचे स्थानक असून आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी येथील प्रवाशांना पुणे विभागीय कार्यालय सोयीचे आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक विचार व्हावा, अशी मागणी खासदार सुळे यांनी यावेळी केली. या मुख्य मुद्द्यासह बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर तालुक्यातील रेल्वेशी संबंधीत समस्यांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
दौंड तालुक्यातील रेल्वे रुळांखालील कानगाव – पाटस रोड (एल.सी. नंबर १५),कडेठाण – वरवंड रोड (एल.सी. नंबर १४) आणि गिरिम वायरलेस फाटा ते नानवीज ट्रेनिंग सेंटर रस्ता (एल.सी. नंबर १७) येथील मोऱ्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरु आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचे पाणी मोऱ्यांमध्ये साचून वाहतुकीला अडथळा ठरत आहे. याशिवाय काम सुरु असल्याने पर्यायी रस्त्याचे गेटही बंद आहेत. परिणामी वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. या मोऱ्यांचे काम तातडीने पूर्ण व्हावे, अशी मागणी सुळे यांनी यावेळी केली.
पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे जेजुरी एमआयडीसी जवळील मोरीचे काम तातडीने सुरु करण्याची गरज असून जेजुरी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील वस्त्यांसाठी सर्विस रोड करण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याबरोबरच पुरंदर तालुक्यातील अन्य ठिकाणी राहिलेली मोऱ्यांची कामेही तातडीने पूर्ण करावी. आंबळे येथील अंडरपासच्या संरक्षक भिंत, शाळेजवळील उड्डाण पूल कोथळे येथील मोरीचे काम अर्धवट अवस्थेतील काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली.