Pedestrian Day Pune | पुणे महापालिका आयोजित पादचारी दिनाला चांगला प्रतिसाद! | पादचारी समस्यां बाबत अभ्यास करून DPR बनविण्याच्या महापालिका आयुक्त यांच्या सूचना
PMC Pedestrian Day – (The Karbhari News Service) – रस्त्यावर चालणारे नागरिक म्हणजेच पादचारी हे रस्त्यावरील सर्वात महत्वाचे घटक असून तसे दुर्लक्षित आहेत. आपल्या देशात रस्त्यावरील अपघातांमध्ये चालणाऱ्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे हे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. पादचारी सुरक्षा व अधिकारांबाबत जनजागृती करण्यासाठी, तसेच पादचारी (ज्यात प्रामुख्याने लहान मुले, वृद्ध / म्हातारी माणसे, स्त्रिया तसेच अंध, अपंग, विकलांग नागरिक) यांच्या बाबत संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी दर वर्षी ११ डिसेंबर रोजी पादचारी दिवस साजरा करणारी पुणे महानगरपालिका देशातील पहिली महापालिका आहे.
या कार्यक्रमात पुणे मनपा बरोबर पुणे वाहतूक पोलीस, लक्ष्मी रस्ता व्यापारी संघटना, पथारीवाले संघटना यांचे सहकार्य फार महत्वाचे आहे. यांच्या सहभागा व सहकार्यामुळे या वर्षी देखील सोमवार ११ डिसेंबर २०२४ रोजी पुणे महानगरपालिके तर्फे चौथ्यांदा हा दिवस अतिशय उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला आहे. चालण्यासाठी स्वच्छ व सुरक्षित पदपथ रास्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित मार्ग ज्यात नियमित रंगवलेले झेब्रा पट्टे, रस्त्याच्या मध्ये उभे राहण्यासाठी बेट ज्यांना रेफुजी आयलंड म्हणतात, सिग्नल, माहिती फलक, पथदिवे इत्यादी हे पादचारी सुरक्षे बाबत चे उपाय रस्त्याचा अतिमहत्त्वाचा घटक आहेत तसेच पादचाऱ्यांचा अधिकार देखील आहे.
दर वर्षी पुणे महानगरपालिका पथ विभाग या दिवसाचे आयोजन करतो. आपल्या पुणे शहरातील सर्वात प्रतिष्ठित व गर्दीचा रस्ता म्हणजे लक्ष्मी रस्ता असल्याने तिथे या दिवसाचे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
लक्ष्मी रस्त्यावरील नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक हा भाग वाहन- विरहित करून तो आकर्षक पद्धतीने सजावण्याचे काम पथ विभागामार्फत करण्यात आले. बुधवार असल्याने सकाळी ८ ते सायंकाळी ८ पर्यंत हा रस्ता वाहनविरहित करून जास्तीत जास्त नागरिक लक्ष्मी रस्त्यावर यावेत या करीत महामेट्रो मार्फत कसबा व मंडई मेट्रो स्थानकापासून खास E- सायकलींचे आयोजन करण्यात आले तसेच पी. एम. पी. एम. एल मार्फत ज्यादा बस सेवा पुरविण्यात आली. नागरिकांनी लक्ष्मी रस्ता “वॉकिंग प्लाझा” चा आनंद घेण्यासाठी चालतच यावे व वाहन धारकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे आवाहन पुणे मनपा ने केले व त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी प्रत्येक ठिकाणी गर्दी केली होती…
या दिवशी लोकप्रबोधनासाठी व नागरिकांच्या करमणुकीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन ही केले. काही प्रमुख कार्यक्रम खालील प्रमाणे आहेत.
१. एकांश ट्रस्ट तर्फे अंध अपंग नागरिक यांच्या बाबत संवेदनशीलता व सार्वत्रिक प्रवेशयोग्यते विषयक
प्रदर्शन
२. युनाइटेड वे मुंबई संस्थे तर्फे लहान मुलांसाठी रस्ता सुरक्षा बाबत कार्यशाळा
४. सेव पुणे ट्रैफिक मुव्हमेंट तर्फे पादचारी अधिकारांबाबत कार्यशाळा व पुणे महानगरपालिकेच्या शाळां मधील विद्यार्थ्यांच्या १७०० चित्रांचे प्रदर्शन.
५. परिसर संस्थे मार्फत सार्वजनिक वाहतूक व जुन्या पुण्याच्या विकासाबाबत पॅनल प्रदर्शन
६. आई.टी.डी.पी संस्थे मार्फत रस्त्यांच्या योग्य रचनेबाबत पुणे मनपाने केलेल्या कामांचे पॅनल प्रदर्शन
तसेच Low Emission Zone बाबत प्रबोधन.
८. रंग कला अकादमी तर्फे पादचारी दिनाबाबत भव्य रांगोळी
१०. रास्ता संस्थेमार्फत संगीत व वाद्य कला सादरीकरण
११. पर्यावरण विभागामार्फत हवेच्या गुणवत्तेची चाचणी व स्वच्छ संस्थे मार्फत प्रदर्शन
कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिर्वाचित आमदार कसबा पेठ चे हेमंत रासने व पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या हस्ते झाले. तसेच कोथरूड चे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत दादा पाटील व अपर पोलीस आयुक्त पुणे शहर मनोज पाटील यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. महापालिका आयुक्त यांनी पादचारी समस्यां बाबत अभ्यास करून DPR बनविण्याच्या सूचना दिल्या. नवनिर्वाचित आमदार यांनी सुद्धा कार्यक्राचे महत्व अधोरेखित केले व महापालिकेचे अभिनंदन केले. हेमंत रासने यांनी ते स्वतः पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष असताना हा पादचारी दिवस सुरु झाला हि बाब नोंदविली व दर वर्षी हा कार्यक्रम असाच करण्यात यावा असे सूचित केले.
COMMENTS