रस्त्यावरील बालकांसाठी पथदर्शी फिरते पथक स्थापन होणार
पुणे | रस्त्यावरील बालकांना (Street children) शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या ‘पथदर्शी फिरते पथक’ (pathfinder) या प्रकल्पास केंद्र शासनाने नाविन्यपूर्ण कार्यक्रमांतर्गत मान्यता दिलेली आहे. पथदर्शी फिरते पथक स्थापन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन पुणे जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
पथदर्शी फिरते पथक हा प्रकल्प पुणे, ठाणे, नाशिक, मुंबई उपनगर, मुंबई शहर व नागपूर या ६ जिल्ह्यामध्ये ६ महिन्याकरीता प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहेत. प्रकल्पास केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाचा खर्च बाल न्याय निधीमधून भागविण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी २५ आसनी बस/व्हॅन साठी एक समुपदेशक, शिक्षिका/शिक्षक, वाहनचालक, काळजीवाहक अशा ४ कर्मचाऱ्यांची एकत्रित मानधनावर नियुक्ती करण्यात येणार आहे. ही बस सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये रस्त्यावरील मुलांची संख्या जास्त असेल अशा गर्दीच्या ठिकाणी फिरेल.
पथदर्शी फिरते पथक स्थापन करण्यासाठी इच्छूक स्वयंसेवी संस्थांनी ७ दिवसाच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गुलमर्ग पार्क, को-ऑप. हौ. सोसायटी, जाधव बेकरी जवळ, २९/२, सोमवार पेठ, पुणे – ४११०११ येथे संपर्क साधून प्रस्ताव सादर करावेत, असेही कळविण्यात आले आहे.
000