Prashant jagtap vs BJP : संस्कृत पुण्यात महापौरांसह भाजप पदाधिकाऱ्यांची संघटित गुंडगिरी : राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा पुन्हा हमला 

HomeपुणेPMC

Prashant jagtap vs BJP : संस्कृत पुण्यात महापौरांसह भाजप पदाधिकाऱ्यांची संघटित गुंडगिरी : राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा पुन्हा हमला 

Ganesh Kumar Mule Oct 29, 2021 6:25 PM

Pune : Vaccination : १५ ते १८ वयोगटाचा कोरोना लसीकरण प्रारंभ!
Ganesh Bidkar : PMPML : पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना तातडीने सातवा वेतन आयोग द्यावा   : पीएमपी सीएमडीना सभागृह नेत्यांनी दिले पत्र
PMC Employee : मनपा नगरसचिव कार्यालयातील सेवकांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप

संस्कृत पुण्यात महापौरांसह भाजप पदाधिकाऱ्यांची संघटित गुंडगिरी

: राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचा पुन्हा हमला

पुणे : पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप गुंडांसोबत वावरण्याचेच काम करीत नाहीत, तर या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रत्यक्ष गुंडगिरी करायला लावून संघटित गुन्हेगारीत सहभागी होत आहेत, हे शुक्रवारी एका प्रकरणात समोर आले आहे. विशेष म्हणजे, पुण्यनगरीचे प्रथम नागरिक अशा प्रतिष्ठेचे पद असलेल्या महापौरांचाही या संघटित गुन्हेगारीत समावेश असल्याचे उघड होत आहे. ही पुणेकर म्हणून नक्कीच शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना आहे. ज्या गुंड सदा ढावरेच्या माध्यमातून ही संघटित गुन्हेगारी करण्यात येत होती, त्या सदा ढावरेला गेल्या आठ दिवसांपासून कुणाकुणाचे फोन आले होते, यात आणखी कोण सहभागी आहे, हे तपासण्यासाठी ढावरेचा ‘सीडीआर’ काढण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी मा. पोलिस आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. अशी महिती राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

: सत्य फार काळ लपून राहात नाही : जगताप

प्रशांत जगताप म्हणाले, भाजपचे  प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काहीजणांचा भाजप प्रवेश करण्याचा प्रयत्न बुधवारी फसला. परंतु, सुसंस्कृत अशी बिरुदावली मिरवणाऱ्या भाजपचा खरा चेहरा उघड करणाऱ्या या घटनेचे वार्तांकन प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपची झोप उडाली आहे. त्यावर सभागृहनेते गणेश बीडकर व भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची व चंद्रकांत पाटील यांची बाजू सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु, त्यात ते पूर्णपणे उघडे पडले आणि माझ्यावर व माझा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर बिनबुडाचे आरोप करण्याचा प्रयत्न केला. खरे तर आपले आणखी काही उघड होऊ नये म्हणून अशी ही धडपड बीडकर यांच्याकडून सुरू होती. परंतु, सत्य फार काळ लपून राहात नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे दोन कारनामे नव्याने उघड झाले आहेत.

जगताप म्हणाले, माझ्या वानवडी प्रभागातील भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी मारहाण केल्याची व धमकावल्याची तक्रार एका ठेकेदाराने केली आहे. यात अधिक चौकशी केली असता, हे प्रकरण तेवढ्यापुरतेच मर्यादित नसून, ही संघटित गुन्हेगारी असल्याचे समोर आले आहे. घोगरे यांनी पैशांच्या बदल्यात ठेकेदाराला काम देण्याचे कबूल केले होते. परंतु, कामही दिले नाही आणि घेतलेले पैसेही दिले नाहीत. उलट पैसे मागणाऱ्या ठेकेदाराला मारहाण केल्याची तक्रार ठेकेदाराने १५ दिवसांपूर्वी पोलिस स्टेशनला दिली आहे. ही तक्रार दाखल करून वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर घोगरेंविरोधात आरोपपत्र दाखल झाले. त्यानंतर फिर्यादीला वारंवार धमक्या देण्यात आल्या. इतकेच नव्हे, तर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हे प्रकरण मिटविण्यासाठी भाजप नगरसेविका अर्चनाताई पाटील यांचे पती तुषार पाटील यांना फोन केला. त्यानुसार, तुषार पाटील यांनी त्यांच्याच पक्षातील गुंड सदा ढावरेला सांगून फिर्यादीला उचलण्याचे आदेश दिले. तुषार पाटील यांच्या सांगण्यावरून सदा ढावरेने फिर्यादीचे अपहरण करून त्याला कोर्टात घेऊन गेले व मारहाण झाली नसल्याचे, तक्रार नसल्याचे प्रतिज्ञापत्र करण्यात आले. फिर्यादीला थेट उचलून नेल्याने त्याच्याकडे पॅनकार्ड, आधारकार्ड असे काहीही कागदपत्र नव्हते. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून फिर्यादीने प्रतिज्ञापत्रावर खोटी सही केली व लघुशंकेचे निमित्त करून तेथून पळ काढला. फिर्यादीने थेट दत्तवाडी पोलिस स्टेशन गाठले आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. या वेळी संपूर्ण घटनाक्रम ऐकल्यानंतर पोलिसांनी गुंड सदा ढावरेला अटक केली. सदा ढावरेच्या चौकशीत त्याने तुषार पाटील यांनी सांगितल्यानुसार अपहरण केल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षकांनी तुषार पाटील यांना फोन केल्यानंतर त्यांनी महापौरांनी सांगितल्यानुसार सदा ढावरेला अपहरण करायला सांगितले, असा जबाब दिला आहे. त्यानुसार, सदा ढावरे व तुषार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणाचा थेट संबंध महापौरांपर्यंत येऊन ठेपला आहे. परंतु, महापौरपद हे सन्माननीय पद असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आम्ही करणार नाही. मात्र, भाजपचे शहराध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, सभागृहनेत्यांनी या प्रकरणी खुलासा करावा, अशी मागणी आम्ही करीत आहोत. तसेच, ही घटना गंभीर असल्याने गेल्या १५ दिवसांपासून सदा ढावरेला कुणाकुणाचे फोन येत होते, हे तपासण्यासाठी ढावरेचा ‘सीडीआर’ काढण्यात यावा, अशी मागणी पोलिस आयुक्तांना करणार आहोत. असे ही जगताप म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1