Omprakash Divate IAS | खोदलेले रस्ते ७ जून पर्यंत पूर्ववत करण्याचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचे आदेश! | कामांची देयके पावसाळा पूर्ण होईपर्यंत अदा करण्यात येऊ नये
Pune PMC News – (The Karbhari News Service) – शहरातील सर्व खोदलेल्या रस्त्यांचे पूर्ववत आवश्यकता भासल्यास जास्त मनुष्यबळ वापरून ७ जून पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे यांनी प्रशासनाला दिले. (Pune Municipal Corporation – PMC)
पावसाळ्यापूर्वी मनपाच्या विविध विभागांना त्यांच्याकडील कामकाजासाठी रस्ते खोदाईची परवानगी देण्यात आली आहे . संबंधित विभागाच्या सर्व मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता , उप अभियंता व कनिष्ठ अभियंता यांचे समवेत आज ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) यांनी आढावा बैठक घेतली.
या बैठकीमध्ये सर्व संबंधित विभागांच्या पथ विभागाकडुन दिलेल्या रस्ते खोदाई परवानगीच्या सर्व ठिकाणच्या तसेच प्रमुख रस्त्यावरील ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. काही अपवाद वगळता बहुतांश विभागांचे काम झालेले असून रस्ते पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान या सर्व खोदलेल्या रस्त्यांचे पर्नपृष्ठीकरण आवश्यकता भासल्यास जास्त मनुष्यबळ वापरून ७ जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) यांनी दिले.
पुर्नपृष्ठीकरण करताना कामे गुणवत्तापूर्वक करण्याबाबत संबंधित म.न.पा. कनिष्ठ अभियंते यांचे प्रशिक्षण आयोजित करावे व त्यांच्या उपस्थितीत ही कामे करून घ्यावी. तसेच त्या कामांची देयके पावसाळा पूर्ण होईपर्यंत अदा करण्यात येऊ नये. आपत्ती निवारण संदर्भातील करावयाची खोदाई आणि कामाच्या संदर्भात पथ विभागाच्या अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय ठेवण्यात येऊन काम करावे अशा सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीस मुख्य अभियंता ( पथ ) अनिरूध्द पावसकर , मुख्य अभियंता ( मलनि:सारण) जगदीश खानोरे , मुख्य अभियंता ( विद्युत ) मनिषा शेकटकर, मुख्य अभियंता ( पाणीपुरवठा ) नंदकिशोर जगताप तसेच संबंधित विभागाचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता , उप अभियंता व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
COMMENTS