Old Pension Scheme | निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार | त्यानंतरच्या कालावधीत रूजू झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा

HomeपुणेBreaking News

Old Pension Scheme | निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार | त्यानंतरच्या कालावधीत रूजू झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा

गणेश मुळे Jul 01, 2024 8:12 AM

Pune Nashik Highway | पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता | उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी
Lahuji Vastad Savle Memorial | आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या कामाचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा
Budget 2025 | पुणे शहराच्या प्रलंबित योजना व प्रकल्पांबाबत केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक अंदाजपत्रकात २००० कोटी रुपयांची तरतूद करा | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

Old Pension Scheme | निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार | त्यानंतरच्या कालावधीत रूजू झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा

शिक्षकांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याबाबत पुढील तीन महिन्यांच्या आत निर्णय घेण्यात येणार | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन

 

Old Pension Scheme – (The Karbhari News Service) – राज्यातील निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले असल्यास त्यांनाही जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय पुढील तीन महिन्यांच्या आत घेण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय मिळण्याबाबतच्या तारांकित प्रश्नाला उत्तर दिले. यासंदर्भात सदस्य संजय केळकर, बाळासाहेब थोरात, आशिष शेलार यांनी प्रश्न-उपप्रश्न विचारले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दिनांक १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिराती निघालेल्या व त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय शासनाद्वारे नुकताच घेण्यात आला आहे. या निर्णयामध्ये केवळ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम १९८२ व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम १९८४ व सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक पर्याय निवडण्याचा विकल्प देण्यात आला आहे. निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यांच्याबाबतीत हा निर्णय लागू करण्यात आला नसल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

न्यायप्रविष्ट प्रकरणाबाबत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शासन मान्यता व अनुदान प्राप्त ज्या शैक्षणिक संस्थांना १०० टक्के अनुदान दिले जाते. त्यास अनुदानित संस्था असे संबोधले जाते, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने ३० एप्रिल २०१९ रोजी दिला आहे. सरकारच्या बाजूने दिलेल्या या निर्णयास शिक्षक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, त्याची कार्यवाही राज्य शासनामार्फत करण्यात येईल, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
देशाच्या, राज्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून तत्कालीन केंद्र सरकारने जुनी निवृत्ती वेतन योजना बंद करून नवीन निवृत्तीवेतन योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरच्या काळात विविध राज्यांतील शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्तीवेतन योजनाच लागू करण्याची मागणी केली होती. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. राज्य शासनानेही केंद्र सरकारकडे याबाबत माहिती मागितली आहे.

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागणीचा अभ्यास करून शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने देखील निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. याबाबत शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी चर्चा केली आहे. जुन्या निवृत्ती वेतनासंदर्भातील राज्य शासनाच्या भूमिकेबाबत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात निवेदन करण्यात आले आहे. जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात काही राज्यांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भातील माहिती देखील मागविण्यात आली आहे. सध्याचे सरकार अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बाजूचे सरकार आहे, त्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. त्यासंदर्भात योग्य पद्धतीचा न्याय दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.