NCP Pune – Ajit Pawar | पुणे कॉंग्रेसचा महत्त्वाचा शिलेदार अजित पवार यांच्या पक्षात!
Vijay Khaladkar – (The karbhari News Service) : पुणे काँग्रेस चा महत्वाचा शिलेदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या गटात घेतला आहे. पुणे शहर उपाध्यक्ष आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांचे विश्वासू सहकारी विजय खळदकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज अधिकृत रित्या प्रवेश केला आहे. विजय खळदकर यांचा प्रभाग ३० मधून “विजय” निश्चित मानला जात आहे. एवढे महत्वाचे शिलेदार आपल्याकडे ठेवणे न जमल्याने आता काँग्रेस च्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली जात आहे. (Pune Politics)
राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यालयात आज अजित पवार यांनी विजय खळदकर यांना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्षात घेतले. खळदकर हे विश्वजित कदम यांचे विश्वासू मानले जातात. सर्वसामान्य कुटुंबातून व संघटनेच्या चळवळीतून आणि पक्ष बांधणीतून वर आलेला कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. खळदकर हे प्रभाग क्रमांक ३०- कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी या प्रभागातून महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. २०१७ साली देखील त्यांनी काँग्रेस कडून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता. त्यावेळी देखील अजित पवार यांनी हात पुढे केला होता. मात्र खळदकर यांनी काँग्रेस चा हात सोडला नव्हता. मात्र सध्या पुणे काँग्रेस मधील गटबाजी पाहता खळदकर यांनी अजित दादा सोबत जाणे पसंद केले आहे.
चर्चा अशी आहे कि, भाजपकडून देखील खळदकर यांना साद घातली जात होती. मात्र खळदकर यांनी अजित पवार यांच्या सादेला प्रतिसाद दिला आणि प्रवेश केला. अजित दादा देखील खळदकर यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेऊन होते. दरम्यान आता खळदकर यांच्या प्रवेशाने प्रभागातील समीकरणे बदलली आहेत. पूर्ण प्रभाग हा राष्ट्रवादी काँग्रेस च्या अखत्यारीत येऊ शकतो, असे बोलले जात आहे. मात्र खळदकर यांना काँग्रेस आणि भाजप अशा दोघांच्या विरोधाचा सामना करून आपला “विजय” सुकर करावा लागणार आहे.

COMMENTS