MSRTC | (Liquefied Natural Gas (LNG)| राज्यातील ५००० एस टी बसेस डिझेल ऐवजी एलएनजीवर धावणार | महामंडळाची २३४ कोटी रुपयांची बचत होणार
| मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
MSRTC | (Liquefied Natural Gas (LNG) | राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) पाच हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (Liquefied Natural Gas (LNG) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
या एलएनजी इंधन वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये सुमारे दहा टक्के घट होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर महामंडळाचे दरवर्षी २३४ कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, किंग गॅस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कुरेशी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महाव्यवस्थापक ( भांडार व खरेदी) वैभव वाकोडे उपस्थित होते.
एकूण ५००० डिझेल वाहनांचे एलएनजी वाहनांमध्ये रुपांतरण हे तीन वर्षामध्ये एकूण ६ टप्यात करण्यात येणार आहे. संपूर्ण पाच हजार बसेसचे रुपांतरण झाल्यानंतर दरवर्षी महामंडळाचे सुमारे २३४ कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होईल, असे श्री. जैन यांनी सांगितले. राज्यातील ९० आगारांमध्ये एलएनजी इंधन भरण्याची सोय करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे डिझेल इंधनावर चालणारी सुमारे १६ हजार प्रवाशी वाहने आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४ टक्के खर्च डिझेलवर केला जातो. हरित परिवहनाची संकल्पना राबविण्यासाठी डिझेल ऐवजी पर्यायी इंधन वापरण्यासाठी उद्योग विभागाने महाराष्ट्रासाठी एलएनजी या पर्यायी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी किंग्स् गॅस प्रा.लि. यांचेबरोबर सामंजस्य करार केला आहे. त्यामध्ये परिवहनासाठी एलएनजीचा वापर व पुरवठा याचा समावेश करण्यात आला आहे. रुपांतरीत झालेल्या वाहनांची देखभाल ही रुपांतरण केलेल्या कंपनी मार्फत करण्यात येणार असुन त्याचा देखभालीचा खर्च महामंडळातर्फे करण्यात येणार आहे.