Mohan Joshi Pune Congress | भाजपला साथ देणाऱ्या पुणेकरांच्या हाती अंदाजपत्रकात ‘भोपळा’च! | माजी आमदार मोहन जोशी यांची टीका

HomeBreaking News

Mohan Joshi Pune Congress | भाजपला साथ देणाऱ्या पुणेकरांच्या हाती अंदाजपत्रकात ‘भोपळा’च! | माजी आमदार मोहन जोशी यांची टीका

Ganesh Kumar Mule Mar 11, 2025 5:49 PM

Baba Adhav Agitation | उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आत्मक्लेश आंदोलन बाबा आढाव यांनी घेतले मागे
Pune Traffic | मुंबईच्या धर्तीवर पुणे वाहतूक शाखेसाठी सह-पोलीस आयुक्त नेमावेत
Savitribai Phule Smarak | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी | अजित पवार

Mohan Joshi Pune Congress | भाजपला साथ देणाऱ्या पुणेकरांच्या हाती अंदाजपत्रकात ‘भोपळा’च! | माजी आमदार मोहन जोशी यांची टीका

 

Maharashtra Budget – (The Karbhari News Service) – राज्याच्या अंदाजपत्रकात (Maharashtra Budget) पुण्याच्या विकासासाठी भरीव तरतूद केलेली नाही. एकंदरीतच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत (Vidhansabha Election) भाजपला साथ देणाऱ्या पुणेकरांच्या हाती अंदाजपत्रकात मात्र, भोपळाच देण्यात आला आहे, अशी टीका माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress) यांनी केली आहे. (Pune News)

पुण्यात महायुतीचे अजित पवार आणि चंद्रकांत पाटील हे दोन कॅबिनेट मंत्री आहेत, माधुरी मिसाळ राज्यमंत्री आहेत आणि मुरलीधर मोहोळ हे केंद्रात राज्यमंत्री आहेत. पुणेकरांनी भाजप आणि महायुतीला भरभरून मते दिल्यामुळे या चौघांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. मात्र, अंदाजपत्रकात पुणेकरांच्या पदरी निराशाच आहे. पुण्याच्या औद्योगिक आणि व्यापारी उलाढालीला चालना मिळावी, यासाठी पुरंदरचा विमानतळ आम्ही लवकरच करू, असे आश्वासन मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन वारंवार दिले आहे. मात्र अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुरंदरच्या विमानतळाचा उल्लेख नाही, भूसंपादनासाठीची तरतूदही नाही, ही बाब धक्कादायक आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका करण्याची इच्छाशक्ती असती तर पीएमपीएमएलसाठी २ हजार बसगाड्या घेण्यासाठी तरतूद करण्यात आली असती. पण, तशी तरतूद करण्यात आलेली नाही. पुणे मेट्रो चा पहिला टप्पा अजून पुर्ण झाला नाही आणि दुसऱ्या टप्प्यासाठी पुढील दहा वर्षांसाठीचा वायदा करून ९हजार कोटींच्या तरतुदी केल्या आहेत. खडकवासला-खराडी आणि नळ स्टॉप ते माणिक बाग अशा दोन मार्गांसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याचे म्हटले आहे. या योजनांना पूर्ण होण्यासाठी १० वर्षांहून अधिक काळ लागणार आहे. ही घोषणाही पोकळच आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५०कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीचा गाजावाजा सत्ताधारी पक्ष करीत आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याची योजना कागदोपत्रीच राहिली आहे, याचा उपमुख्य मंत्री अजित पवार यांना विसर पडला आहे, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

‘लाडकी बहिण’ योजनेबाबतही महायुती सरकारने महिलांची फसवणूकच केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना अनुदान चालू केले आणि निवडणुकीनंतर २,१०० रुपये करू, असे आश्वासन दिले. यासाठी वारेमाप खर्च करून जाहिराती केल्या. महिलांनी भरवसा ठेवून महायुतीला मते दिली. मात्र, सत्ता आल्यानंतर त्या आश्वासनांना अंदाजपत्रकात हरताळ फासण्यात आला, असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: