आमदार सुनील कांबळे यांना मंत्रिपद!
पुणे | उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने भाजप एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन सरकार बनवण्याच्या तयारीत आहे. लवकरच नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे. यामध्ये कॅंटोन्मेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांना मंत्रिपद मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.
आमदार सुनील कांबळे हे पुणे भाजपचे जुने नेते आहेत. तसेच त्यांनी नगरसेवक पदी निवडून येण्याचा देखील विक्रम केला आहे. आमदार होण्या अगोदर ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. कॅंटोन्मेंट मध्ये आपल्या कामामुळे नेहमी निवडून येतात. खास करून मागासवर्गीय समाजात त्यांना मानणारा वर्ग आहे. याचाच फायदा कांबळे यांना नवीन मंत्रिमंडळात होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण भाजपच्या आमदारांमध्ये मागासवर्गीय आमदार कमी आहेत. कांबळे आणि उमरखेड चे नामदेव ससाणे ही ती नावे आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याला जर पद द्यायचे असेल आणि मागासवर्गीय समाजाचा प्रतिनिधी म्हणून सुनील कांबळे यांना सामाजिक न्याय मंत्री पद दिले जाऊ शकते. असा कयास व्यक्त केला जात आहे. दिलीप कांबळे यांना देखील हे पद देण्यात आले होते. त्यावेळी गिरीश बापट हे पुण्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे पुणे परिसरातून तशी मागणी देखील होत आहे.
चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री
मात्र दुसरीकडे अशीही चर्चा आहे कि चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होऊ शकतात. त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. त्यामुळे पुणे शहरातील या दोन आमदारापैकी कुणाला मंत्री पद मिळणार आणि कुणाला पुण्याचा पालकमंत्री करणार याकडे लक्ष लागले आहे. कारण पुण्याकडे सर्वांचे लक्ष असते. आता आगामी काळात महापालिका निवडणूका येऊ पाहताहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी महापालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी पालकमंत्र्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.