संभाजी भिडे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेस आक्रमक
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महिलांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले. या वेळी भिंडे यांच्या फोटोवर महिलांनी टिकल्या लावून त्यांचा निषेध केला.
एका महिला पत्रकाराशी बोलताना भिंडे यांनी वक्तव्य केले होते. त्या निषेधार्थ प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. माजी नगरसेविका लता राजगुरू, निता राजपूत, नंदा ढावरे, रमा भोसले, कांता ढोणे, छाया जाधव, ॲड. राजश्री अडसूळ, मोनिका खलाने, ॲड. अश्विन गवारे, मोनाली अपर्णा, मंगल निक्कम, ॲड. रेशमाताई, आयेशा शेख यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
तिवारी म्हणाल्या, ‘‘शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. या देशातील कित्येक महिलांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. महिलांनी कुंकू लावावे का नाही, हा आमचा निर्णय, आमचा हक्क आहे. देशात लोकशाहीनुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. संताप येणारी विचारधारा आहे, त्याचा आम्ही निषेध करतो.’’