महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर,शिक्षक मतदार संघ द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघ आणि तीन शिक्षक मतदारसंघ अशा एकूण पाच मतदार संघांसाठी द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नाशिक व अमरावती विभाग पदवीधर तसेच कोकण, औरंगाबाद आणि नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी 30 जानेवारी 2023 रोजी निवडणुक होणार आहे. आजपासून या निवडणूकीची आचारसंहिता संबंधित पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात लागू करण्यात आली आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
गुरुवार दि. 5 जानेवारी 2023 रोजी या निवडणूकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. गुरुवार दि. 12 जानेवारी 2023 ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. शुक्रवार दि. 13 जानेवारी 2023 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल्, सोमवार दि. 16 जानेवारी 2023 ही नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अतिम तारीख असेल. सोमवार दि. 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 08:00 ते दुपारी 04:00 वाजेपर्यंत मतदान होणार असून गुरुवार दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी मतमोजणी होईल.
सर्वश्री डॉ. सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ), डॉ. रणजित पाटील (अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ), श्री.विक्रम काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ), श्री.नागोराव गाणार (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ), श्री. बाळाराम पाटील (कोकण विभाग शिक्षक मतदार संघ) हे विधानपरिषद सदस्य 7 फेब्रुवारी 2023 रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या या पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.