Maharashtra Shiksha Parishad | पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध

HomeपुणेBreaking News

Maharashtra Shiksha Parishad | पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध

गणेश मुळे Jul 03, 2024 3:36 PM

Maharashtra Cabinet Meeting Decisions |आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय जाणून घ्या
Maratha reservation survey | Backward Classes Commission will not extend the deadline
Cyber Crime Policy | Maharashtra | सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्यात सायबर इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म

Maharashtra Shiksha Parishad | पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध

 

Maharashtra Rajya Pariksha Parishad – (The Karbhari News Service) –  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या परिषदेच्या https://www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल ३० एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला होता. या निकालाच्या अनुषंगाने ३० एप्रिल ते १० मे २०२४ या कालावधीत संबंधित शाळेमार्फत गुणपडताळणीसाठीचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. गुणपडताळणीचे अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीही तयार करण्यात आली आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इ. ५ वी) परीक्षेस नोंदणी केलेल्या ५ लाख १० हजार ६७२ विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ९२ हजार ३७३ उपस्थित राहिले. त्यापैकी १ लाख २२ हजार ६३६ विद्यार्थी पात्र ठरले. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ. ८ वी) परीक्षेस नोंदणी केलेल्या ३ लाख ८१ हजार ५८८ विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ६८ हजार ५४३ उपस्थित राहिले. त्यापैकी ५६ हजार १०९ विद्यार्थी पात्र ठरले. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ. ५ वी) पात्र विद्यार्थ्यांपैकी मंजूर संचाच्या आधारे १६ हजार ६९१ तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ. ८ वी) पात्र विद्यार्थ्यांपैकी मंजूर संचाच्या आधारे १४ हजार ७०३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.

या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास अंतिम निकाल परिषदेच्या संकेतस्थळांवर वैयक्तिकरित्या स्वतःचा बैठक क्रमांक टाकून पाहता येणार आहे. तसेच शाळांना त्यांच्या लॉगीनमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल एकत्रितपणे पाहता येणार आहे. तथापि, शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्याचे गुणपत्रक त्याच्या बँक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता किंवा डाऊनलोड करता येणार नाही. संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्याला स्वतःचा शिष्यवृत्ती संच प्रकार (अर्हता) पाहता येणार आहे. छापील गुणपत्रक आणि प्रमाणपत्र शाळांना पाठविण्यात येणार आहे.

संकेतस्थळावरील प्रसिद्ध करण्यात आलेली शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची माहिती, तसेच इतर अनुषंगिक माहितीच्या लिंक ‘अंतिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी)’, ‘गुणवत्ता यादी (राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय)’ ‘शाळा सांख्यिकीय माहिती (जिल्हानिहाय, तालुकानिहाय)’ अशा आहेत. विद्यार्थी, पालक, शाळा, क्षेत्रीय अधिकाऱ्यांना लिंकवर क्लिक करून माहिती डाऊनलोड करता येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली आहे.