Maharashtra Politics | विरोधी पक्षांनाच सत्ताधाऱ्यांबरोबर बसण्याची हाव असेल तर लोकशाहीचा गाडा टिकेल कसा? आणि मग युवकांचा राजकारणातला रोल मॉडेल कोण असणार?
Maharashtra Politics | (Author: Ganesh Mule) | लोकशाहीचे (Democracy) जसे चार महत्वाचे स्तंभ आहेत, अगदी त्याचप्रमाणे आणि किंबहुना त्याहूनही महत्वाचा लोकशाहीचा आधार हा विरोधी पक्ष (Opposition Party) असतो. मात्र विकासाचे कारण देत तोच विरोधी पक्ष जर सत्ताधाऱ्या (Ruling Party) सोबत हातमिळवणी करून सत्तेत बसू लागला तर हा लोकशाहीचा गाडा टिकेल कसा? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने अशाच गोष्टी घडत चालल्या आहेत. त्यामुळे युवकांचा (Youth) राजकारणावरील विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे आम्ही राजकारणात रोल मॉडेल (Roll Model) म्हणून कुणाकडे पाहायचे, असा संभ्रम राजकारणात येऊ पाहणाऱ्या आणि सर्वसामान्य युवकांना पडला आहे. (Maharashtra Politics)
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. जे काही घडतं त्यामुळे लोक फक्त सुन्न होतात. सुरुवातीला भाजप (BJP) हा मोठा पक्ष असून देखील भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. मुख्यमंत्री कुणाचा असणार, या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपचा हात सोडला. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेवर आली. यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा सगळ्यात मोठा हात होता. काँग्रेस (INC), शिवसेना (Shivsena)आणि राष्ट्रवादीने (NCP) सत्ता स्थापन केली. मात्र हे सहन न झाल्याने आणि विरोधी पक्षात बसण्याची वेळ आलेल्या भाजपने कुरघोड्या करायला सुरुवात केली. यात सगळ्यात आघाडीवर होते ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis). फडणवीस हे पवारांना शह देतात म्हणून त्यांची लोकप्रियता वाढू लागली होतीच. शिवाय त्यांना केंद्राकडून देखील साथ मिळत असल्याने त्यांचे महाराष्ट्रात वर्चस्व वाढत चालले होते. (Maharashtra Political Crisis)
मग फडणवीस यांनी आपले बुद्धिचातुर्य चालवत आणि गनिमी कावे करत शिवसेनेत उभी फूट पाडली. उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सेना एकाकी पडली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडाने शिवसेना तर फुटलीच मात्र महाविकास आघाडीला देखील आपली सत्ता राखता आली नाही. मग भाजप आणि शिंदे यांनी ठाकरेंचं उरलं सुरलं देखील सगळं हिरावून घेतलं. बंडखोरी केलेली सगळी लोकं ही ED आणि तत्सम यंत्रणांना घाबरलेली होती. फक्त हेच लोक नाही तर काँग्रेस, उद्धव यांची सेना आणि राष्ट्रवादीतील लोकांच्या मागे देखील यंत्रणा लावल्या जात होत्या. कुठल्याही पद्धतीने दबाव आणून विरोधी पक्ष कमकुवत करायचा हा चंग बांधून भाजपने कुरघोड्या सुरु ठेवल्या.
याचाच परिणाम म्हणून राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी (Ajit Pawar) नुकतेच बंड केले. विरोधी पक्षात असणारा राष्ट्रवादी मग लगेच सत्ताधारी झाला. शरद पवारांना हे माहित होते कि नाही, हे पुढे उघड होईलच. मात्र या सगळ्या घटनांमुळे मात्र सर्वसामान्य लोक, युवक यांचा मात्र राजकारणावरील विश्वास उडत चालला आहे. शिवाय सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणारा विरोधी पक्ष जर सत्तेच्या दावणीला बांधला जात असेल तर लोकशाहीचा गाडा कसा टिकणार? लोकांच्या आशेचा किरण कोण असेल? असे प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडू लागले आहेत.
जे चाललंय ते सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं आहे, हे याचमुळे. कारण काँग्रेस ला कंटाळून लोकांनी भाजपला मोठा पक्ष बनवलं. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आपल्या आशेचा किरण मानलं. मात्र भाजपने लोकांच्या हिताची भूमिका घेतली असं दिसून येत नाही. भ्रष्टाचारी लोकांच्या मागे यंत्रणा लावल्या म्हणून लोकांना भाजपविषयी आदर वाटू लागला. पण कालांतराने भाजपने त्याच लोकांना आपल्या पक्षाचा आश्रय देत त्यांना मंत्री केलं. त्यामुळे लोकांना यातला नेमका बोध कळेना. तसेच शरद पवार यांचं महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील मक्तेदारी मोडून काढणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. मात्र त्यांच्या कुरघोड्या पाहता ते लोकांसाठी कमी आणि सत्तेसाठी चिटकून राहण्यासाठी सर्व गोष्टी करतात, हे लक्षात येऊ लागलं. शरद पवारांच्या नेहमीच्या बदलत्या भूमिकेमुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास उरला नाही. कालच्या प्रकरणात आपला हात नाही, असं शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी लोकं आता त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.
सत्ताधाऱ्यांनी लोकांचं, लोक काय बोलतात यावर फार लक्ष द्यायचं नसतं आणि आपला अजेन्डा चालवायचा असतो, अशी एक रीत पडून गेली आहे. मात्र विरोधी पक्षानं लोकांची बाजू घेऊन लोकांचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून द्यायचा असतो, हे देखील सोयीस्कर रित्या विसरले जात आहे. अशा परिस्थितीत उत्साहाने राजकारणात येऊ पाहणाऱ्या नवख्या युवकांनी नेमकं कुणाला आदर्श मानायचं? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
यात लोकांनाच अग्रणी भूमिका घ्यायला हवीय. राजकारणातून आपला फार विकास होत नसतो, हे आता तरी लोकांनी लक्षात घ्यायला हवंय. आपला विकास आपल्यालाच करावा लागतो. आपल्याशिवाय आपल्याला कुणी वाचवू शकत नाही, हे सूत्र लक्षात घेऊन आणि राजकारणाकडे दुर्लक्ष करून लोकांनी स्वविकास करून घ्यायला हवाय.
—
सर्वच राजकीय पक्ष म्हणतात, तरुणांनी राजकारणात आले पाहिजे पण युवा वर्गाने कोणाचा आदर्श घ्यावा हाच मोठा प्रश्न आज निर्माण झाला आहे. ज्यांचा आदर्श घ्यावा अशी व्यक्तिमत्वे कधी एका पक्षात तर कधी दुसऱ्या पक्षात हे वास्तव सद्यस्थितीत आहे आणि पक्षाची ध्येयधोरणे काय ? या मुद्द्याला तिलांजली दिली जात असल्याचे वास्तवही आहे.त्यामुळे युवा वर्गाने राजकारणात यावे ही साद एकीकडे घातली जात आहे आणि दुसरीकडे जनहितासाठी आवश्यक असणारा विरोधी पक्ष कायमचा हद्दपार करण्याचे डावपेच सुरू आहेत त्यासाठी राजकारणात फोडाफोडीचे राजकारण तर खुलेआम होत आहे मात्र विकासाच्या नावाखाली स्वार्थ साधला जात असेल तर लोकहिताचा विचार कुणीच करत नाही असेच म्हणावे लागेल.
– हेमंत बागुल, काँग्रेस कार्यकर्ता.
——
Article Title | Maharashtra Politics | If only the opposition parties want to sit with the rulers, how can the car of democracy survive? And then who will be the role model of the youth in politics?