Madhuri Misal | मेट्रोचा राडारोडा तातडीने हटवा | अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश | माधुरी मिसाळ
| वाहतूक, रस्ते, खड्डे आणि कचरा व्यवस्थापनाचा आढावा
Pune PMC News – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे शहरातील वाहतूक, रस्ते, खड्डे, अतिक्रमण आणि कचरा व्यवस्थापनाबत आढावा बैठक पार पडली. नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि शहरातील सुरू असलेल्या विकासकामांचा या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. (Pune Breaking News)
बैठकीत मंडईच्या भाडेवाढीचा मुद्दा तसेच मेट्रो प्रकल्पाद्वारे तयार करण्यात आलेल्या गाळ्यांच्या वाटपाबाबत चर्चा झाली. मेट्रोच्या विविध कामांमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन कामानंतर रस्त्यावर पडून राहिलेला राडारोडा तातडीने हटवून रस्ते पूर्ववत करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
शहरातील अनधिकृत पथ विक्रेत्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासावर उपाय म्हणून अतिक्रमण विभागाने अनधिकृत पथ विक्रेत्यांवर नियमानुसार प्रभावी कारवाई करण्याचे आदेश मिसाळ यांनी दिले.
एकता नगर, निंबस नगर आणि विठ्ठलवाडी परिसरातील पुणे महानगरपालिकेच्या क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाचा आढावा घेऊन प्रकल्पाच्या प्रगतीतील अडचणी दूर करून कामाला गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी कचरा विलगीकरणाची प्रक्रिया वेगवान आणि कार्यक्षम पद्धतीने राबविण्याबाबत चर्चा झाली. कचरा संकलन व व्यवस्थापनात आवश्यक सुधारणा करून नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
सिंहगड परिसरातील भूसंपादन प्रक्रियेला गती देऊन रस्त्यांशी संबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित पायाभूत सुविधांचे प्रश्न प्राधान्याने सोडवून शहरातील विकासकामांना गती द्यावी, असे मिसाळ यांनी सांगितले.
या बैठकीला आमदार हेमंत रासने कसबा विधानसभा, आमदार भीमराव तापकीर खडकवासला मतदारसंघ, महापौर मंजुषा दीपक नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) प्रजित नायर, मेट्रो प्रकल्प व्यवस्थापक धनंजय गाडगीळ तसेच महापालिकेचे विविध विभागांचे खातेप्रमुख, उपायुक्त आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS