Maharashtra Budget 2025-26 | अर्थसंकल्पात पुणेकरांसाठी भरीव निधीची तरतूद..!
| पुणेकरांना उत्तम सुविधा देण्यासाठी महायुती सरकार कटिबध्द – शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे
Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प महायुती सरकारच्या नेतृत्वात अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांनी सादर केला. महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पात पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीमुळे पुणे शहराच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे. (Pune News)
शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे म्हणाले की, या अर्थसंकल्पात पुण्यासाठी भरीव निधी देत विशेष लक्ष केंद्रित केले. यामध्ये प्रामुख्याने पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ₹८३७ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून, या तरतुदीमुळे शहरातील मेट्रोच्या कामांना वेग येईल आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल. तसेच, मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पासाठी २३० कोटी रुपयांच्यानिधीची तरतूद करण्यात आली असून, यामुळे नदी प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संतुलन राखले जाईल.
पुणे शहराच्या पाणीपुरवठा आणि मलिनिसरण व्यवस्थापनेसाठी अनुक्रमे १३२१ कोटी रु. आणि ८१२ कोटी रु. निधी दिला असून, त्यामुळे शहरातील स्वच्छता आणि पाणीपुरवठा व्यवस्थापन अधिक सक्षम होईल. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ८ नवीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी ९९२ कोटी रु. निधीची तरतूद करण्यात आली आहे.
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही भरीव तरतुदी करण्यात आली असून, शिक्षणासाठी ४६८ कोटी रु. आणि आरोग्यासाठी ५०५ कोटी रु. मंजूर करण्यात आले आहेत. या निधीमुळे शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील.
तसेच कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती प्रकल्प, वारजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना, सिंहगड रोड उड्डाणपूल आणि नदी पुनर्जीवन प्रकल्प, श्वान प्रेमींसाठी डॉग पार्क उभारणी, फेरीवाल्यांसाठी हॉकर्स प्लाझा असे महत्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले आहेत.
या सर्व तरतुदींमुळे पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. पुणेकरांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहराचा विकास निश्चितपणे वेगाने होईल असे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी म्हटले आहे.
———
पुणे शहरासह महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार!
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रगती पथावर असणाऱ्या महाराष्ट्राला आणखीन गतिमान करणारा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांनी सादर केला. अर्थसंकल्पात प्रत्येक समाजघटकाचा विचार करून भरीव तरतूद करण्यात आल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील विकासाला समान संधी मिळणार आहे.
पुण्यातील विस्तारित नवीन दोन मेट्रो मार्ग, हरित ऊर्जा प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया तसेच शहर आणि जिल्ह्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना भक्कम आर्थिक बळ मिळणार आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नसून, राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा विकसित महाराष्ट्राचा हा ठोस संकल्प आहे.
– हेमंत ज्योती नारायण रासने, आमदार, कसबा विधानसभा
———
विकसित भारत – विकसित महाराष्ट्र हे साध्य करण्याचा मार्ग सुकर करणारा राज्याचा हा अर्थसंकल्प आहे. विशेषत: पुण्यातील पायाभूत सुविधा जसे की नवीन मेट्रो मार्ग, हरित ऊर्जा प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया तसेच पुणे जिल्ह्यातील कृषि आणि ग्रामीण क्षेत्रसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. ह्याच बरोबर राज्यातील विविध पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी भरीव तरतूद तसेच राज्यातील सांस्कृतिक वारसा जपण्यासाठीच्या नवीन संकल्पना राबविण्यासाठी अर्थसंकल्पात भक्कम पाठबळ देण्यात आलेले आहे. केंद्राचे पाठबळ, आंतर राष्ट्रीय वित्तीय संस्थांचे सहाय्य, योजनांचे सुसूत्रीकरण ह्यांच्या अनुषंगाने मागील योजनांच्या अंमलबजावणी सोबतच राज्यातील विविध नवीन योजनांसाठीच्या आर्थिक तरतुदीमध्ये ३३ टक्के इतकी भरीव वाढ करण्यात आली. आहे हे राज्याची आर्थिक स्थिति चांगली असल्याचेच द्योतक आहे.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ.
———
अर्थसंकल्पात आश्वासनांचे बुडबुडे फुटले…
विधानसभा निवडणुकीत महायुतीने आश्वासनांची खैरात वाटली होती. पण सत्तेवर येताच या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडण्याचे काम केले असून, अर्थसंकल्पाचे सोपस्कार उरकण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे, हा अर्थसंकल्प म्हणजे सर्व घटकांचा भ्रमनिरास आहे.
निवडणुकीच्या ऐन तोंडावर लाडकी बहीण योजना राबवण्यात आली. दिवाळीचा वाढीव हप्ता देता यावा, यासाठी निवडणुकीची घोषणाही लांबवण्यात आली. प्रचारामध्ये या योजनेचा मोठा गवगवा करण्यात आला आणि १५०० रुपयांवरून ही रक्कम २१०० रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या यादीतून नावे कमी करण्यात येत होती. आता तर, पैसे वाढविण्याचा वादा सरकारच्या फायलीमध्ये बंद झाला आहे.
राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. निवडणुकीत सरकारने कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात त्याबाबत अद्याप स्पष्ट घोषणा झाली नाही. त्याचा उल्लेखही या अर्थसंकल्पात नाही. भावांवर योजनेविषयी सरकार काय बोलण्यास तयार नाही. आता पाच वर्षे निवडणुका नाहीत, म्हणून सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. या अर्थसंकल्पात कृषी आणि कृषीसंलग्न क्षेत्राकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले आहे.
‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ अशी घोषणा सरकारकडून देण्यात येत आहे. परंतु, हा अर्थसंकल्प पाहिल्यास बेरोजगारी, महागाई, कर्जबाजारी, महिला असुरक्षितता यापासून महाराष्ट्र थांबणार नाही, असेच त्यांना म्हणायचे असेल, असेच दिसून येत आहे.
- प्रशांत जगताप
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, पुणे.
COMMENTS