Madhav Jagtap PMC | उपायुक्त माधव जगताप यांच्यावर महापालिका आयुक्त यांच्याकडून कारवाई!
| अतिरिक्त महापालिका आयुक्त यांची माहिती
Pune PMC News – (The Karbhari News Service) – औंध येथील परिहार चौकातील शिवदत्त मिनी मार्केट मधील गाळे धारकांना बेकायदेशीररित्या परवाने दिल्याप्रकरणी दोषी आढळलेले अतिक्रमण विभागाचे तत्कालीन उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांच्यावर महापालिका आयुक्तांनी कारवाई केली आहे. महापालिका मिळकत कर विभागातही (PMC Property Tax Department) अधिकार नसताना दोन हजार चौ.फूटांपेक्षा अधिक क्षेत्रफळांच्या मिळकतींच्या करात परस्पर बदल केल्याप्रकरणी जगताप यांनी हयगय केल्याचे आढळले आहे. यामुळे जगताप यांच्या दोन वेतनवाढ तात्पुरत्या रोखल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. (Prithviraj B P IAS) यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)
– खाते कुठले मिळणार याची प्रतीक्षा
दरम्यान मिळकत कर विभागाचा पदभार माधव जगताप यांच्याकडून काढून घेण्यात आला होता. तो उपायुक्त प्रतिभा पाटील यांना देण्यात आला आहे. जगताप यांच्याकडे अद्याप कुठल्याही विभागाचा पदभार देण्यात आलेला नाही. आता शिस्तीचा भंग केल्याबद्दल जगताप यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र महापालिका अधिनियम 56 नुसार एकाच व्यक्तीला दोन शिक्षा दिल्या जात नाहीत. त्यामुळे आता जगताप यांना कुठल्याही एका विभागाचा पदभार देणे आवश्यक आहे. त्यानुसार जगताप यांना कुठले खाते मिळणार, याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
औंध येथील परिहार चौकालगतची जागा महापालिकेने अकरा वर्षांसाठी शिवदत मित्र मंडळाला दिली होती. मंडळाने या जागेवर मिनी मार्केट सुरू केले होते. अकरा वर्षांचा करार संपल्यानंतर महापालिकेने पुन्हा करार वाढविण्यास असमर्थता दर्शविली होती. यानंतरही तत्कालीन अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप यांनी स्वत:चा अगोदरचा निर्णय फिरवत येथील गाळेधारकांना पथारी परवाने दिले. वस्तुत: २०१७ पासून पथारी परवाने बंद असताना हे परवाने दिले गेले. एवढेच नव्हे तर गाळेधारकांच्या यादीमध्ये बदलही करण्यात आले. परवान्यांसाठी रहिवासी दाखला बंधनकारक असताना पाच गाळेधारकांना दाखले नसतानाही परवाने देण्यात आले होते. दरम्यान स्थानीक नगरसेविका अर्चना मुसळे आणि त्यांचे पती ऍड. मधुकर मुसळे यांनी येथील गाळयांमुळे अडकलेला पदपथ मोकळा करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यावेळी याठिकाणी परवाने देण्यामध्ये अनेक गैरप्रकारच झाल्याचे निशर्दनास आल्यानंतर त्यांनी जनआंदोलन उभारले. यामुळे महापालिका आयुक्तांनी याप्रकरणाची चौकशीचे आदेश दिले. त्यामध्ये माधव जगताप आणि त्यांचे काही सहकारी यांनी हयगय केल्याचे आढळले. जगताप हे खात्यांतर्गत चौकशीमध्ये दोषी आढळले, यामुळे त्यांच्यावर कारवाई प्रस्तावीत करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सांगितले.
पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, की यासोबतच मिळकत कर विभागाचा कार्यभार असताना माधव जगताप यांनी अधिकार क्षेत्रात नसतानाही दोन हजार चौ.फूटांपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या मिळकतींच्या करांमध्ये परस्पर बदल केल्याचीही प्रकरणे निदर्शनास आली आहेत. मिळकत कराचा दर महिन्याचा आढावा घेताना अशी काही प्रकरणे निदर्शनास आली, त्यामध्येही कारवाई प्रस्तावीत करण्यात आली. असे पृथ्वीराज बी.पी. यांनी नमूद केले.
COMMENTS