Lahuji Salve Smarak | लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे भूमिपूजन शनिवारी | पुण्यात महायुती कडून जल्लोष साजरा
Pune – (The Karbhari Online) – मातंग समाजाच्या समस्या दूर करण्यासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्थेची स्थापन करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाचे भूमी पूजन देखील शनिवारी करण्याची घोषणा सरकारने केली. त्याबाबत सरकारचे अभिनंदन करत पुण्यात महायुती कडून जल्लोष साजरा करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हे निर्णय घेतले आहेत. त्यानिमित्त महायुती कडून जल्लोष साजरा केला गेला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, राष्ट्रवादीचे माजी सभागृह नेते सुभाष जगताप तसेच स्मारक समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मातंग समाज हा महाराष्ट्रासह संपुर्ण देशात वास्तव्यास आहे. या समाजातील बहुतांशी नागरिक भूमीहीन असून, मोलमजुरी करून आपले जीवन जगत आहे. उच्च शिक्षणापासून हा समाज वंचित आहे. तसेच शासकीय सेवेत देखील या समाजातील युवकांची संख्या अत्यंत कमी आहे. शासनाने मातंग समाजाच्या मागण्या व प्रश्न सोडवून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने तातडीची उपाययोजना केली पाहिजे. याबाबत सातत्याने मागणी केली जात होती. भारतीय राज्यघटनेच्या 341 या कलमांतर्गत राष्ट्रपतीच्या मान्यतेने राज्यांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट असलेल्या जातीची यादी निश्चित करण्यात आलेली आहेझ त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात 59 जातीचा’ समावेश आहे. त्यापैकी काही जाती त्या सुशिक्षित आहेत. तर काही जाती या अत्यंत मागासलेल्या आहे. त्यामुळे मागास जातीच्या उन्नतीसाठी या जातीचे वर्गीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. अशी मागणी केली जात होती. तसेच आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी (जि. पुणे) येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी शासनाकडून आज पर्यंत विलंब होत आहे. त्याबाबत देखील निर्णय घेण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार सरकारने दखल घेत या मागण्या मान्य केल्या आहेत.