Khadakwasla Dam | खडकवासला धरणातून मुठा उजव्या कालव्यातील विसर्ग अचानक 700 वरून 1000 क्युसेक्स

Homeadministrative

Khadakwasla Dam | खडकवासला धरणातून मुठा उजव्या कालव्यातील विसर्ग अचानक 700 वरून 1000 क्युसेक्स

Ganesh Kumar Mule Jul 17, 2026 9:18 PM

Pune Rain | खडकवासला धरणातून ९ वाजता १० हजार ६११ क्यूसेक पाण्याचा विसर्ग  करण्यात येणार! 
Khadakwasla Dam Chain | Pune Rain Update | खडकवासला मधून पाण्याचा विसर्ग सोडला जात नाही तोपर्यंत शहरात पाणीकपात सुरूच राहण्याची शक्यता!
Vitthal Raje Pawar | “इंदापूर तहानलेला, शेतकऱ्यांची फसवणूक” – शेतकरी संघटनेचा पुणे महापालिका व लोकप्रतिनिधींविरुद्ध उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

Khadakwasla Dam | खडकवासला धरणातून मुठा उजव्या कालव्यातील विसर्ग अचानक 700 वरून 1000 क्युसेक्स

सजग नागरिक मंचकडून कारणे जाहीर करण्याची मागणी

 

Sajag Nagrik Manch – (The Karbhari News Service) – पुण्यातील नागरिकांच्या डोक्यावर पाणीकपातीची टांगती तलवार असतानाच जलसंपदा विभागाने आज खडकवासला धरणातून मुठा उजव्या कालव्यात सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा विसर्ग अचानक 700 क्युसेक्सवरून 1005 क्युसेक्सपर्यंत वाढवला आहे. या निर्णयामागील कारणे तातडीने जाहीर करावीत, अशी मागणी सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी मुख्य अभियंता, जलसंपदा, पुणे विभाग यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे. (Vivek Velankar)

वेलणकर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जुलैमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर खडकवासला धरण भरताच जलसंपदा विभागाने मुठा उजव्या कालव्यात पाणी सोडण्यास सुरुवात केली. त्यानुसार 7 जुलै रोजी 500 क्युसेक्स, 8 आणि 9 जुलै रोजी 700 क्युसेक्स, 10 जुलै रोजी 350 क्युसेक्स, तर 11 ते 16 जुलै या 6 दिवसांत 700 क्युसेक्सने पाणी सोडले गेले.

मात्र आज अचानकपणे हा विसर्ग 30 टक्क्यांनी वाढवून 1005 क्युसेक्स करण्यात आला आहे. पालख्या पुणे जिल्ह्यातून पुढे गेल्या आहेत. 11 दिवस सलग 700 क्युसेक्स पाणी सोडल्यामुळे दौंडला पाणीपुरवठा करणारा तलावही भरला असणे अपेक्षित असताना हा वाढीव विसर्ग कशासाठी करण्यात आला, असा सवाल वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.

या निर्णयामुळे पुण्यातील पाणीपुरवठ्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. धरणातील पाणीसाठा कमी होऊन भविष्यात पाणीकपातीची वेळ येऊ नये, यासाठी हा विसर्ग वाढवण्यामागील वस्तुस्थिती आणि कारणे तातडीने स्पष्ट करावीत, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

माहिती अधिकार कायदा 2005 चे कलम 4(1)(C) आणि 4(1)(D) नुसार सार्वजनिक हिताच्या निर्णयामागील कारणे स्वयंस्फूर्तीने जाहीर करणे बंधनकारक आहे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

“खडकवासला धरण हे पुणे शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत आहे. अशा परिस्थितीत विसर्गात अचानक वाढ करण्यापूर्वी नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे होते. प्रशासनाने याबाबत तातडीने खुलासा करावा,” असे वेलणकर यांनी पत्रात म्हटले आहे.

सजग नागरिक मंचकडून जलसंपदा विभागाच्या या निर्णयावर लक्ष ठेवण्यात येत असून, प्रशासनाने दिलेल्या खुलाशानंतर पुढील भूमिका ठरवली जाणार आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: