लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आम्ही शपथ घेतो
– महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
पुणे : अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारे महात्माजी गांधी आणि जय जवान जय किसान नारा देणारे स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी ही दोन्ही व्यक्तिमत्वे आमच्या अंतःकरणातील असून जीवनाचा भाग झाली आहेत, त्यांना स्मरून देशातील लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आम्ही शपथ घेतो,अशी प्रतिज्ञा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रार्थना सभेत बोलताना केली.
: शहर काँग्रेस च्या वतीने प्रार्थना सभा
महात्मा गांधी आणि स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पुणे रेल्वे स्थानक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ पुणे शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने आज ( शनिवारी ) सकाळी प्रार्थना सभा आयोजिण्यात आली होती. याप्रसंगी प्रारंभी ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते महात्माजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर वैष्णव जन तो, आणि रघुपति राघव राजाराम ही महात्माजींची प्रिय भजने म्हणण्यात आली. यावेळी थोरात यांच्यासह अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार उल्हासदादा पवार, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांची भाषणे झाली.
अहिंसा आणि सनदशीर मार्गाने लढा देऊन महात्माजींनी देशाला स्वातंत्र्य दिले. लोकशाही आणि संविधान आपण स्विकारले. त्या मार्गाने देशातील सर्व घटकांचे हित साधण्याचा प्रयत्न राहिला. पण अलिकडे केंद्रातील मोदी सरकार लोकशाहीला तिलांजली देऊन संविधान गुंडाळण्याचा प्रयत्न करीत आहे. पण महात्माजींचा विचार मानणारे आम्ही सर्वजण लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करू, असे थोरात यांनी सांगितले.
देशातील सध्याच्या वातावरणात महात्मा गांधी यांच्या विचारांची आणि शास्त्रीजींच्या संयमी आणि खंबीर नेतृत्त्वाची प्रकर्षाने गरज भासते आहे, असे वक्त्यांनी भाषणात बोलताना सांगितले.
COMMENTS