Freedom of Speech | भारतामध्ये माध्यम स्वातंत्र्याची अवस्था बिकट : निरंजन टकले
Freedom of Speech – (The Karbhari news service) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील लोकांप्रती आपले काय दायित्व आहे, हे माहितच नाही, त्यामुळे त्यांनी दहा वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. उलट त्यांनी वृत्त वाहिन्या असोत किंवा मुद्रुत माध्यमं असोत, सर्वांचे स्वातंत्र हिरावून घेतले आहे. यामुळे भारतामध्ये माध्यम स्वातंत्र्याची अवस्था बिकट झाली आहे, अशी टिका ज्येष्ठ पत्रकार व प्रदेश काँग्रेसचे स्टार प्रचारक निरंजन टकले यांनी केली.
पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत टकले बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी, सरचिटणीसवीरेंद्र किराड, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, राज अंबिके, इत्यादी उपस्थित होते. प्रारंभी राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले.
टकले म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी ज्या – ज्या ठिकाणी डोकं टेकवले, ते सर्व संपवण्याचे काम केले आहे. मग ती संसद असोत, लालकृष्ण आडवाणी असोत किंवा इतर नेते असोत. मोदी धार्मिक भावनेला आवाहन देण्याचे काम करतात. काँग्रेसने या देशाला संविधान दिले, त्याच संविधानानुसार देश चालतो. देश मनुस्मृतीनुसार नक्कीच चालणार नाही. मात्र भाजपला देश मनुस्मृतीनुसार चालवायचा आहे. त्यासाठी त्यांना देशातील संविधान हद्दापार करायचे आहे. संविधान बदलण्याची भाषा भाजपचेच नेते बोलत आहेत. त्यानंतर टिका होऊ लागल्याने मोदींनी संविधान बदलणार नाही, अशी गॅरंटी दिली.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात हिंदू मुस्लिम उल्लेख कुठेच नाही, मात्र भाजप व मोदींकडून धादांत खोटा प्रचार केला जात आहे. देशातील ४८ लाख लोकांनी काँग्रेसचा जाहीरनामा डाऊनलोड केला. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या प्रत्येक सभेकडे भाजपचे बारीक लक्ष आहे, ते लगेच त्यावर बोलतात. काँग्रेसचा जाहीरनामा लोकांच्या हिताचा आहे, लोकतो पसंत करत आहेत, म्हणून भाजपकडून जाहीरनाम्यावर टिका केली जात आहे. मंगळसुत्राचा वाद निर्माण केला जात आहे.
उलट भाजपच्या जाहीरनाम्यात ५३ वेळा मोदींचा फोटो आहे, यात बेकारी व बेरोजगारीचा उल्लेखही नाही. भाजपचा जाहीरनामा अत्यंत पोकळ आहे. मोदी जितके खोटे बोलतील तितका काँग्रेसचा पाठिंबा वाढेल. दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर आणखी भाजपच्या पायाखालची वाळू घसरणार आहे.
अग्निवीर योजना मोदींनी राजकारणात आणली. महाराष्ट्रात अग्निवीर योजना देवेंद्र फडणवीस यांनी आणली. शिंदे व पवार भाजपचे अग्निवीर आहेत. या दोघांना दोघे मिळून चार वर्षे मिळणार आहेत.
दहा वर्षात मोदी सरकारने नागरिकांची आतोनात हानी केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात मोदी व भाजपबद्दल प्रचंड रोष आहे. दक्षिणेतल्या राज्यात भाजपचा एकही खासदार निवडून येणार नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या ४० जागा निवडून येतील, असा विश्वासही टकले यांनी व्यक्त केला.