संगणक विषयक साहित्याची मागणीपत्र माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे पाठवू नका
: माहिती व तंत्रज्ञान विभागाचे आदेश
पुणे : माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत इतर विभागांसाठी कुठल्याही प्रकारचे संगणक साहित्य खरेदी करण्यात येणार नाही. त्यामुळे प्रत्येक विभागाने संगणक विषयक साहित्याची मागणीपत्र मध्यवर्ती भांडार कार्यालयाकडे पाठवावे, असे आदेश माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुखांनी दिले आहेत.
यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. एक चर्चा अशी आहे कि माहिती व तंत्रज्ञान विभाग आपली जबाबदारी झटकत आहे. कारण संगणक साहित्य विषयक जास्त माहिती याच विभागाला असते. भांडार विभाग फक्त खरेदी करू शकतो. या आधी सर्व विभागाचे मागणीपत्र माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे जात असे, त्यानंतर भांडार विभाग खरेदी करत असे. आता सगळीच जबाबदारी मध्यवर्ती भांडार विभागावर टाकण्यात आली आहे. तर दुसरीकडे असे बोलले जात आहे कि माहिती तंत्रज्ञान विभागाने स्वतः कडे घेतलेले अधिकार या आदेशाने संपवले आहेत. कारण माहिती तंत्रज्ञान विभागाच साहित्याची मागणी करण्यास सांगत असे आणि खरेदी भांडार कडून करून देत असे. मात्र या आदेशाने पालिकेचा नेमका काय फायदा होणार आहे, हे लक्षात आलेले नाही.
: असे आहेत आदेश
महापालिका आयुक्त यांचे सूचनेनुसार केंद्रीय स्तरावरती खरेदीच्या अनुषंगाने सर्व संगणक विषयक साहित्याची खरेदी मध्यवर्ती भांडार विभागामार्फत करण्यात येणार असून सर्व खातेप्रमुखांना त्यांच्या कार्यालयाकडे लागणाऱ्या संगणक साहित्याची मागणी त्यांनी उपआयुक्त, मध्यवर्ती भांडार कार्यालय यांच्याकडे मागणीपत्र पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यास विनंती आहे. प्रत्येक विभागाने आवश्यकते नुसार संगणक साहित्याबाबत आपले स्तरावर वित्तीय समितीची मान्यता घेवून खरेदी कामे परस्पर भांडार विभागाकडे संपर्क करावा. माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत इतर विभागांसाठी कुठल्याही प्रकारचे संगणक साहित्य खरेदी करण्यात येणार नाही. संगणक साहित्याचे स्पेसिफिकेशन व माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे तदनुषंगाने असलेली अर्थसंकल्पातील आर्थिक तरतूद मध्यवर्ती भांडार कार्यालयास मागणीनुसार पुरविण्यात येईल.
COMMENTS