साडेचार वर्षात केलेली कामे मतदारांपर्यंत पोचविण्यात कमी पडू नका
: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगरसेवकांना दिला आदेश
पुणे : पुणे महापालिकेत सत्तेत आल्यानंतर गेल्या साडेचार वर्षात केलेली कामे मतदारांपर्यंत पोचविण्यात कुठेही कमी पडू नका. मेट्रो, पीएमपीची बस खरेदी यासारखी मोठी कामे केवळ आपल्यामुळेच झाली आहेत. महापालिकेच्या पातळीवरदेखील खूप कामे झाली आहेत. त्यामुळे निवडणुकीला आत्मविश्वासाने सामोरे जाताना आपण केलेली कामे ठामपणे मतदारांसमोर ठेवा.आत्मविश्वासाने लढा विजय आपलाच आहे.या शब्दात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील नगरसेवकांना विश्वास दिला.
भाजपाचे दोन दिवसीय शिबीर
महाआघाडीची एकत्र लढण्याची तयारी एका बाजूला सुरू आहे. दुसरीकडे भाजपाने एकटयाचा बळावर लढण्याची तयारी सरू केली आहे. भाजपाचे पुण्यात ९९ नगरसेवक आहेत. पुणे महापालिकेच्या इतिहासात एवढे बहुमत कुणालाच कधी मिळाले नव्हते.या सर्व ९९ नगरसेवकांचे दोन दिवसांचे अभ्यास शिबीर सध्या पुण्यात सुरू आहे. आज या शिबीराचा दुसरा दिवस आहे.
शिबीराला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशिवाय पुण्याचे खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित आहेत.
महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या पाश्र्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजपाचे दोन दिवसांचे शबीर याच तयारीचा भाग आहे. महापविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांच्यात एकत्र लढण्यावर एकमत झाले असून चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत.पुढच्या फेऱ्यांमध्ये प्रत्यक्ष जागावाटपाची चर्चा होणार आहे.
महाविकास आघाडीची एकत्र लढण्याची तयारी पाहून भाजपा खडबून जागा झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याबाबत पक्षाचा केंद्रीय स्तरावरून निर्णय होणार आहे.त्याबाबत अनिश्चितता आहे.शिवाय भाजपाचा निर्णय झाला तरी त्यावर मनसेचा काय प्रतिसाद येतो यावर सारेकाही अवलंबून आहे. सध्यातरी भाजपा आणि मनसे या दोघांचीही भूमिका गुलदस्त्यात आहे. त्यामुळे भाजपाने सध्यातरी एकट्याच्या बळावर लढण्याची तयारी केली आहे. एकटे लढलो तरी आपण पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास पक्षाच्या स्थानिक आणि राज्य पातळीवरील नेत्यांना वाटत असला तरी वस्तुस्थिती तशी नाही हे निश्चित.
COMMENTS