उद्यापासून सलग ७५ तास कोविड लसीकरण
मिशन कवच कुंडल मोहिम यशस्वी करण्यासाठी सप्तपदी निश्चित
पुणे: शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार ८ ऑक्टोबर २०२१ ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रामध्ये लसीकरण न झालेल्या सर्व लाभार्थ्यांना पहिली मात्रा व देय असलेल्या लाभार्थ्यांना दुसरी मात्रा लवकरात लवकर देण्याकरीता ‘मिशन कवच कुंडल’ कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात करण्यात आले असून ही मोहीम व्यापक स्वरूपात राबवून अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. तर उद्यापासून सलग ७५ तास लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. असे ही देशमुख यांनी सांगितले.
मिशन कवच कुंडल
पुणे जिल्ह्यात ‘मिशन कवच कुंडल’ मोहिम प्रभावीपणे राबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, तालुकास्तरावर तालुकास्तरीय टास्क फोर्स यांची बैठक तात्काळ आयोजित करावी. यामध्ये सर्व विभागांचे अधिकारी विशेषतः शिक्षण, महिला व बालकल्याण, ग्रामविकास, महसूल, पोलीस आणि इतर आवश्यक विभागांचा सहभाग घेण्यात यावा. ग्रामीण भागामध्ये प्रा.आ. केंद्र हे नियोजनाचे केंद्र असावे. तालुका आरोग्य अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांनी गावनिहाय शिल्लक लाभार्थीप्रमाणे सुक्ष्म कृती आराखडा तयार करावा. एका गावाचे लसीकरण पुर्ण झाल्यानंतर दुसऱ्या गावाचे लसीकरण सुरु करावे.
मोहिमेचे आयोजन करीत असताना लसीकरण सत्राची व्यापक प्रसिध्दी करण्यात यावी. आरोग्य विभागाने लसीकरण करण्याची जबाबदारी पार पाडावी आणि इतर विभागांनी शिल्लक लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रांवर घेवून येण्याची आणि सत्र व्यवस्थापनाची जबाबदारी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीमध्ये या विशेष मोहिमेमध्ये मनुष्यबळाअभावी लसीकरण मोहिम पार पाडण्यास अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी.
एका दिवसात ५ लाख लसीकरण करण्याचे उदिष्ट
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: सलग ७५ तास कोविड लसीकरण:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या केंद्र शासनाच्या योजने अंतर्गत बारामती तालुक्यातील महिला रुग्णालय, दौंड तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, हवेली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लोणीकाळभोर, खडकवासला, वाघोली, खेड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय चाकण, मुळशी तालुक्यातील उपकेंद्र हिंजवडी या केंद्रावर सोमवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते गुरुवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ दुपारी ११ वाजेपर्यंत सलग ७५ तास कोविड लसीकरण राबविण्यात येणार आहे.
विक्रमी उद्दिष्ट ५ लक्ष लसीकरण:- पुणे जिल्ह्यात एकंदरीत ८९८ खाजगी व १ हजार १६ शासकीय कोविड लसीकरण केंद्रे कार्यान्वित असून एकंदरीत प्रशिक्षित मनुष्यबळाचा व खाजगी संस्थांचा सहभाग लक्षात घेता एकाच दिवसात ५ लक्ष लाभार्थ्यांचे कोविड लसीकरणाचे विक्रमी उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
COMMENTS